अभिनंदनसाठी भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानी मंत्र्याला फुटला होता घाम!

ताज्या घडामोडी देशविदेश

इस्लामाबाद :  विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला सोडवण्यासाठी भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री घाबरले होते, बैठकीत पाय थरथर कापत होते घाम फुटला होता, असा दावा पाकिस्तानी संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी केला आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मागील वर्षी 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी एफ-16 फायटर जेटला नेस्तनाबूत केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं विमान देखील क्रॅश झालं आणि ते पीओकेमध्ये पडलं होतं. या मुद्द्यावरुन पाकीस्तानात अजूनही राजकारण सुरु आहे.

खासदार अयाज सादिक यांनी बोलताना दावा केला की, भारताच्या हल्ल्याला घाबरुन इमरान खान सरकारने भारतीय वायुदलाचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना अचानक सोडण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानी खासदार अयाज सादिक यांनी संसदेत दावा केला आहे की,  मला चांगलंच आठवतंय की, या बैठकीत महमूद शाह कुरैशी उपस्थित होते. या बैठकीला येण्यास  इमरान खान यांनी नकार दिला होता. यावेळी कुरैशी यांचे पाय थरथरत होते. त्यांच्या डोक्याला घाम आला होता. कुरैशी आम्हाला म्हणाले की, अभिनंदनला परत जाऊ द्या, कारण रात्री 9 वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे.  अयाज सादिक म्हणाले की, भारत पाकिस्तानवर कुठलाही हल्ला करणार नव्हता.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मागील वर्षी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी एफ-16 फायटर जेटला नेस्तनाबूत केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं विमान देखील क्रॅश झालं आणि ते पीओकेमध्ये पडलं होतं. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना ताब्यात घेतलं होतं. तिथं विमान कोसळल्यानंतर  विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानात असल्याचा भास झाला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील काही महत्वाची कागदपत्रं तलावात फेकली तर काही कागद चावून खाऊन टाकले होते.

भारत सरकारने यानंतर अभिनंदन यांना परत पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर 28 फेब्रुवारीला पाकिस्तानी संसदेत अभिनंदन यांना भारतात सोडण्याबाबत इमरान खान यांनी घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *