‘मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी’, पॅरोलवरील आरोपीच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

कोल्हापूर ताज्या घडामोडी

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असणाऱ्या आरोपीने आपल्या व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ‘मर्डरला एक वर्षे पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी’ असा व्हिडीओ लावल्याचे उघड झाले आहे. हा व्हॉट्सअॅप स्टेटस इचलकरंजी शहरामध्ये चर्चेचा विषय बनला. त्यानंतर तातडीने पोलिसांनी दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपी आकाश संजय वासुदेव याला पोलिसी खाक्या दाखवीत अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी दीपक कोळेकर नावाच्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून झाला होता. याप्रकरणी अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेव आणि त्याच्या गॅंगने दहशत माजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. जामिनावर बाहेर आल्यानंतर या टोळीने आपल्या मोबाईलवर ‘मर्डरला एक वर्ष पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी सुरू’ अशा पद्धतीचा व्हिडीओ मोबाईल स्टेटस म्हणून ठेवला. या स्टेटसची चर्चा संपूर्ण इचलकरंजी शहराबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या टोळीला अटक केली आहे.

आकाश वासुदेव या गुन्हेगारावर नोव्हेंबर महिन्यात जर्मनी गॅंगचा मोरक्या अभिजीत तेरणे आणि साथीदारांना कडून खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात वासुदेव गंभीर जखमी झाला. मात्र तरीदेखील वासुदेव गॅंगने गुन्हेगारी कारनामे सुरूच ठेवले. त्यामुळे या गॅंगवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी ‘मर्डरला एक वर्ष पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी सुरू’ त्या स्टेटस वरून आकाश वासुदेव आणि त्याच्या गॅंगच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *