वॉर्नर वादळात दिल्लीची दाणादाण

ताज्या घडामोडी लेख

   दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या हैद्राबाद विरूद्ध दिल्ली लढतीत  सनराज्ञझर्सचा *३४ वर्षीय कर्णधार डेव्हीड वॉर्नरने ३४ चेंडूत ६६ धावांची वादळी खेळी करत* दिल्लीची दाणादाण उडवून दिली. तर बऱ्याच कालावधीनंतर बॅट हाती घेतलेल्या रिद्धीमान साहाने दिल्लीच्या सहनशक्तीची परिक्षा घेत तुफानी ८७ धावांची बरसात करत गोलंदाजांना दे माय धरणी ठाय करून सोडले. नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करलेल्या श्रेयस अय्यरचे मनसुबे उधळून लावत हैद्राबाद फलंदाजांनी नवाबी थाटात फलंदाजी करत दिल्ली गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या आणि सामन्यात एकतर्फी विजय साकारला.
खरेतर श्रेयस अय्यरने गोलंदाजी पत्करुन चुक केली असे वाटत नाही. कारण आतापर्यंत गोलंदाजीत अचूक रबाडा, वेगवान नॉर्जे, कंजुष अश्र्विन, किफायती अक्षर पटेलला नवोदित तुषार देशपांडे उत्तम साथ देत होता. मात्र या सर्वांव *डेव्हिड वॉर्नरचा दृढनिश्चय भारी पडला*. आपल्या वाढदिवसाचा जल्लोष करायला त्याने दिल्ली गोलंदाजांना निवडले आणि कोणत्याही गोलंदाजाला दयामाया न दाखवता निर्दयपणे झोडपले. या दोघांनी सलामीला शतकी भागीदारी करत हैद्राबाद संघाला सुरेख सुरुवात करून दिली.
वास्तविकत: वॉर्नरने आपल्या नावारुपाला साजेशी खेळी केली मात्र डावात खरी रंगत आणली ती रिद्धीमान साहाने. उत्तम यष्टीरक्षण करणारा हा गुणी खेळाडू त्याच्यावर कसोटीचा शिक्का बसल्याने *वनडे, टी ट्वेंटीत दुर्लक्षित आहे*. मात्र किरकोळ शरीरयष्टीच्या साहाने आपल्या झंझावाती फलंदाजीने यापुर्वीही हा गैरसमज खोडून काढला होता. या सामन्यात समोर वॉर्नरचा धडाडा सुरू व्हायच्याच पहिले साहाने दिल्लीच्या दर्जेदार गोलंदाजांवर प्रहार केले. आपण केवळ कसोटीच नव्हे तर झटपट क्रिकेटमध्येही हात दाखवू शकतो हे त्याने दणदणीत अर्धशतक झळकावत दाखवून दिले.
वॉर्नरने साहाच्या साहय्याने मोठ्या धावसंख्येचा पाया रचताच त्याला *मनिष पांडेने उत्तुंग कळस चढवला*. त्याने अनुभवी केन विलीयम्सला साथीला घेऊन हैद्राबाद संघाला दोनशेच्या पार पोहचवले आणि सामन्यात आपल्या गोलंदाजांना फार कष्ट उपसावे लागणार नाही याची दक्षता घेतली. अर्थातच फळ्यावर २१६ धावा लागताच हैद्राबाद गोलंदाजांचा भाव वाढला आणि त्यांनी सामन्याच्या उत्तरार्धात दिल्लीच्या *किंमती फलंदाजांना बेभाव, बेधाव करून सोडले*.
आतापर्यंत गुणतालिकेत ड्रायव्हिंग सिटवर बसणारा दिल्ली संघ अचानकपणे हेलकावे खाऊ लागला आणि समोर अवाढव्य लक्ष्य पाहताच त्यांचे अवसान गळून पडले. तडाखेबंद खेळी करणारा गब्बर आणि दिल्ली संघाचा तारणहार मार्कस स्टोईनिस १४ धावांत माघारी परतताच दिल्ली कॅपीटल्स साठी *दिल्ली बहोत दुर है* हे ठरलेच होते. तरीपण अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर आणि रिषभ पंत सामना जिवंत ठेवतील असे वाटत होते. विशेषतः अजिंक्य रहाणेने थोडीफार चमक जरुर दाखवली परंतु प्रचंड गुणवत्ता आणि वारंवार संधी मिळूनही एखादा  खेळाडू परफॉर्मन्सच्या बाबतीत कसा *दरिद्रीनारायण* ठरू शकतो हे त्याची कामगिरी पाहून सहज लक्षात येते.
बाराव्या षटकात कर्णधार श्रेयस अय्यर बाद होताच या सामन्यात दिल्लीच्या वाट्याला भोपळा येणार यावर शिक्कामोर्तब झाले. हैद्राबाद संघासाठी आनंदाची बाब म्हणजे त्यांना या सामन्यात दोन गुण तर मिळालेच शिवाय *प्रत्येक गोलंदाजांना  विकेटरूपी बळीचा प्रसाद पण मिळाला*. या हंगामात दिल्लीच्या विजयी घोडदौडीत प्रमुख भुमिका निभावणारे वेगवान गोलंदाज निष्प्रभ ठरल्याने त्याचा जबर फटका दिल्ली संघाला बसला आहे. सोबतच रमतगमत प्लेऑफमध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग बाधीत झाला असला तरी ते कमबॅक करण्यास सक्षम आहेत तर हैद्राबाद संघात अजुनही धुगधुगी बाकी असल्याने ते सुद्धा प्लेऑफसाठी आशावादी नक्कीच असतील

डॉ अनिल पावशेकर ९८२२९३९२८७anilpawshekar159@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *