कारवाईस जाणार्‍या तहसीलदारास चक्क वाळूमाफियांनी वाहन आडवे लावून रोखले दोघांविरूध्द गुन्हा दाखल

क्राईम सोलापूर

?

️मंगळवेढा(प्रतिनिधी )ः मंगळवेढयात वाळूमाफियांनी अक्षरशः थैमान घातले असून याचा खुद्द अनुभव तहसीलदार स्वप्नील रावडे यांना दि. 6 ऑगस्ट रोजी रात्री 1.00 वा. वाळू चोरी रोखण्यासाठी जात असताना  आला असून या प्रकरणी आरोपी विजय नायकवडी व कपील परचंडे या दोघांविरूध्द अदखलपात्र गुन्हा तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून नोंदविला आहे.
सोलापूर जिल्हयात सध्या कोठेही शासकीय वाळूचा ठेका न झाल्यामुळे वाळूमाफियांनी अक्षरशः वाळू चोरीचा उच्छांद मांडला असून रात्री 12.00 ते पहाटे 5.00 पर्यंत वाळूची वाहने  सुसाट वेगाने  मंगळवेढा शहरात येत आहेत.ही वाहने प्रामुख्याने पंढरपूर तालुक्यातून येत असल्याचा महसूल विभागाचा आरोप आहे. भिमा नदी,माण नदी व शासकीय ओढे यातूनही बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी शासनाने पोलिस प्रशासन,महसूल प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन अशी संयुक्त कारवाई करण्याच्या सक्त सूचना असतानाही हे विभाग गांधारीची भूमिका घेत असल्याने वाळूमाफियांचे मात्र फावत आहे. दि. 6 ऑगस्ट रोजी तहसीलदार स्वप्नील रावडे हे शासकीय वाहनाने वाहन चालक अजित मुलाणी,तलाठी विजय एकतपुरे यांचेसह वाळू चोरी रोखण्यासाठी जात असताना कारखाना चौकात आले असता उचेठाण गावाकडून येत असलेले वाळूने भरलेले डमडम ताब्यात घेत असताना आरोपी विजय नायकवाडी व कपील परचंडे  हे बिगर नंबरच्या मोटर सायकलवर येवून मोटर सायकल आडवी लावून कामात अडथळा आणला असल्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भा.दं.वि.कलम 186,34 प्रमाणे गुन्हा नोंदविला असून अधिक तपास पोलिस नाईक तुकाराम कोळी हे करीत आहेत. वाळूमाफियांमध्ये दोन गट तयार झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न भविष्यात निर्माण होवू शकतो. या वाळू उपशावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या  वाहनाच्या मागे व पुढे मोटर सायकली रस्त्यावरून रात्रभर फिरत असल्याने  आवाजाचा त्रास नागरिकांनाही होत आहे.तहसीलदार यांच्या निवासाभोवताली 20 ते 25 युवक रात्रभर घिरटया मारत असल्याने तहसीलदारलाही कारवाईसाठी बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. या टोळक्यांचा नाहक त्रास गल्लीतील नागरिकांनाही सोसावा लागतो आहे.मंगळवेढत्त तालुक्यात वाळूमाफियांनी मांडलेला हैदास पोलिस प्रशासनाने तात्काळ थांबवावा अन्यथा टोळ नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी पोलिस प्रशासनास दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *