दहावीची परीक्षा रद्द : बारावीची परीक्षा कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर घेण्यात येणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुबंई :कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे, परिणामी पुढे ढकलण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाले आहे. बारावीची परीक्षा कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मेपर्यंत होणार होत्या. मात्र, कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने आज झालेल्या मत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी परीक्षेबाबत चर्चा सुरू केली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा परिस्थितीत परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगितले. देशभरातील सात ते आठ राज्यांनी ज्या पद्धतीने १० वी परीक्षा रद्द केल्या आहेत, तेथे ज्यापद्धतीने १० वी तील विद्यार्थ्यांना ११ वीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय राज्यात घेण्यात यावा. ज्या मुलांना परीक्षा द्यायची आहे त्यांना ती देण्याची मुभा असावी अशी मागणी केली. या विषयाबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यावर एकमत झाले. याआधी  सीबीएसई बोर्डाच्याही परीक्षा रद्द झाल्या आहेत.  त्याच धर्तीवर मूल्यमापनाची पद्धत अवलंबण्यात येणार आहे. 

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मेअखेरीस १२ वी परीक्षा घेण्याबाबत विचार केला जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी होईल.  त्यामुळे परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *