मोहोळ : वकिलाचे कार्यालय फोडून, रोकड लंपास

क्राईम सोलापूर

मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):
          वकिलाचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्याने आठ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हि घटना घटना १६ ते १७ जुलै दरम्यान मध्यरात्री मोहोळ शहरात घडली. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे. दहा दिवसांची संचारबंदी चालू असताना घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ॲड.श्रीरंग लाळे हे मोहोळ तालुक्यातील नामवंत वकील आहेत. पोलिस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सोलापूर रोड नजीक त्यांचे कार्यालय आहे.१६ जुलै रोजी त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी आलेल्या पक्षकाराने त्यांना आठ हजार रुपये वकील फी दिली होती. सदरची रक्कम त्यांनी टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवली होती. त्यानंतर ते संध्याकाळी आपल्या गावी (घाटणे ता. मोहोळ) येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते कार्यालय जवळ गेले असता कार्यालयाच्या दरवाजाचे लॉक कोणीतरी तोडून खाली टाकल्याचे त्यांना दिसले. यावेळी त्यांनी आत जाऊन पाहिले असता कार्यालयातील फाईली, कायद्याची पुस्तके व अन्य साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे त्यांनी टेबलचा ड्रॉवर उघडून पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले ८ हजार व पूर्वीचे तीनशे रुपये अशी मिळून एकूण आठ हजार तीनशे रुपयांची रक्कम गायब झाली होती. यावरून आपल्या कार्यालयात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.         घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी ॲड. लाळे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरटा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच चोरी झाल्याने मोहोळ मधील व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.तर चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *