गावकऱ्यांनो, गाव कोरोनामुक्त करा 50 लाख जिंका, ठाकरे सरकारकडून स्पर्धेची घोषणा

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे ग्रामीण भाग कोरोनामुक्त होण्यासाठी खास स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कोरोनामु्क्त गाव करणाऱ्या पंचायतीला 50 लाखांचा निधी दिला जाणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती  हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार आहे. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.

कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष 2515 व 3054 या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केले जाणार आहे.

या स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *