राज्यपाल नियुक्त सदस्यांची राज्यपालांकडे पाठवणार यादी

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे वाद पेटला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीने राज्यपालांच्या पत्रावर जोरदार आक्षेप घेतला आहे. आता याच वादात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची 12 जागा रिक्त झाल्या आहेत. पण, या जागेवर कुणाला पाठवावे असा मोठा प्रश्न उपस्थितीत झाला होता. त्यातच राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्यामुळे या यादीला आणखी विलंब झाला होता. पण, आता महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्याचे निश्चित केले आहे.  राज्यपालांबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने हीच संधी साधून यादी पाठवण्याचे ठरवले आहे. पुढील आठवड्यात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्य सरकार राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 4 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली, जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून हिंदुत्वाचा विसर पडला आहे, असे पत्र लिहिले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी भाषेत पत्र लिहून राज्यपालांसह भाजपला कोंडीत पकडले आहे. त्यात; भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.  त्यामुळे महाविकास आघाडीने ही संधी दवडणार नाही, हे निश्चित आहे.

कला, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त करू शकतात. त्यामुळे या 12 सदस्यांच्या निवडीचा अधिकार हा राज्यपालांना देण्यात आलेला आहे.

मंत्रिमंडळाने ज्या सदस्यांची नावांची राज्यपालांकडे शिफारस केली जातात, ती स्वीकारली जातात. परंतु, राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये संबंध ताणले गेले. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल निर्देशित उमेदवारी देण्याचा निर्णय हा प्रलंबित ठेवला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सुचवलेली 12 सदस्यांची नावं राज्यपाल तातडीने स्वीकारतील का हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *