ठाकरे सरकारकडून मराठा समाजाला मोठा दिलासा, EWS आरक्षणाचा मिळणार लाभ!

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS (economic weaker ) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशामुळे मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार आहे, त्यासाठी 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार या आरक्षणाचा 10 टक्के फायदा घेऊ शकणार आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारने हा प्रयत्न केला आहे.  राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता तसा निर्णय सरकारने घेतला होता. पण, आता आधीचा निर्णय मागे घेत EWS लागू करण्यात आले आहे.

सध्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसींना 49.5 टक्के आरक्षण लागू आहे. याशिवाय सर्वणांना 10 टक्के आरक्षण करण्यासाठी घटनादुरुस्तीद्वारे कायदा करण्यात आला आहे. 2019 मध्ये याबद्दल आदेश काढण्यात आला होता.

महाराष्ट्रात अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व ओबीसी आणि महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गासाठी आरक्षण कायदा आहेत. या कायद्यांमध्ये आरक्षणाच्या यादीत ज्या जातींचा समावेश नाही, त्याच जातीतील व्यक्तींना आर्थिक दुर्बलांसाठीचे 10 टक्के आरक्षण लागू करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले होते. त्यानुसार ‘एसईबीसी’मध्ये मराठा समाजाचा समावेश होत असल्याने त्यांना राज्यात 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार नव्हता. पण, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

तर दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे.  मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. तसंच, 6 जूनला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *