हौशी जोडपं! मनसोक्त फिरण्यासाठी सोडली चांगल्या पगाराची नोकरी, 5 महिन्यापासून करतायेत प्रवास

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : मनसोक्त भटकंती करत जग पहायचं, आपला भारत पाहायचा अशी स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. बरेच जण नोकरी करता करता रजा काढून किंवा मिळणाऱ्या सुट्टीत अशा प्रवासाच्या योजनाही आखतात. पण मनसोक्त भटकंतीसाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडणाऱ्या व्यक्तींबद्दल तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. परदेशातील अनेक लोक (Traveller) असं करतात. मात्र, आपल्याकडे तो ट्रेंड फारसा दिसत नाही. केरळमधील एका जोडप्यानी मात्र असंच केलंय.

थ्रिसुरमध्ये राहणाऱ्या हरिकृष्णन जे आणि लक्ष्मी कृष्णा या पती-पत्नीने आपली सेल्स आणि ग्राफिक डिझायनरची नोकरी सोडून भटकंतीला (Road Trip) जाण्याचा निर्णय घेतला. पैसे कमवण्यासाठी ते दोघंही फ्री लान्सिंग करतात. आपल्या हुंडाई क्रेटा कारने त्यांनी 28 ऑक्टोबर 2020 ला सुरू केलेला प्रवास अजूनही सुरू आहे. सीएनएन ट्रॅव्हलरला (CNN Traveller) दिलेल्या मुलाखतीत हरिकृष्णन म्हणाला, ‘आम्हाला दोघांनाही फिरायला खूप आवडतं त्यामुळेच 2019 मध्ये आम्ही थायलंडला बॅकपॅक ट्रिप करत हनीमून साजरा केला होता. त्यात आम्हाला इतका आनंद मिळाला की आम्ही टिनपिन स्टोरीज नावाचं आमचं युट्युब चॅनल (Tinpin Stories You Tube Channel) सुरू केलं.’

पहिल्यांदा त्यांनी हृषिकेश, हिमाचल प्रदेशातली काही खेडी, कर्नाटकातील हंपी, चिकमंगळूर यासारख्या जवळच्या ठिकाणांना भेटी दिल्या. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी निर्णय घेतला की क्रेटा कारमध्ये राहायचं आणि तिनेच प्रवास करायचा. ते रात्री कारमध्येच झोपतात आणि सकाळी प्रवासाला निघतात. ते स्वत: स्वयंपाक करून जेवण करतात. आधी त्यांनी आंतरराष्ट्रीय ट्रिप (International Trip) करायचं ठरवलं होतं. पण कोविडमुळे सगळ्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद होत्या त्यामुळे त्यांनी भारतात भटकंती करायचं ठरवलं.

नोकरी सोडून भटकंती करण्याच्या त्यांच्या निर्णयाला त्या दोघांच्याही कुटुंबीयांनी पाठिंबा दिल्याचं ते सांगतात. या भटकंतीला निघण्यापूर्वी त्यांनी नियोजन केलं. प्रत्येकाचे 10 जोडी कपडे, स्वयंपाकाची भांडी, बादली, मग आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी लॅपटॉप हे साहित्य बरोबर घेऊन ही मंडळी निघाली. त्यांनी 60 दिवस प्रवास करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी 2.5 लाख रुपये खर्च येईल असा त्यांचा अंदाज होता. आतापर्यंत त्यांचा 130 दिवसांचा (130 Days Travel) प्रवास झाला आहे आणि तुलनेनी त्यांना खूपच कमी खर्च आला आहे. उडुपीपासून गोकर्णापर्यंत त्यांनी सर्व प्रवास केला आहे. आपला अनुभव त्यांनी युट्युबवर व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत 10 हजार किलोमीटर फिरल्यानंतर बहुधा ते एप्रिल महिन्यात त्यांच्या गावी थ्रिसुरला पोहोचतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *