दुष्काळात तेरावा महिना; आर्थिक टंचाईत टोल दरवाढीचे संकट

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाई असताना आता त्यात टोल दरवाढीचा भुर्दंड देखील सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलच्या दरांमध्ये आता वाढ केली जाणार आहे. ही वाढ पाच रुपयांपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत असेल. तसेच मासिक पासच्या दरात देखील वाढ करण्यात येणार आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू होईल. एकीकडे लोकल बंद असताना, टोल दरवाढीमुळे मुंबईत ये-जा करणाऱ्य लाखो वाहनधारकांना आता आर्थिक फटका बसणार आहे.

मुंबईत प्रवेश करण्यासाठी पाच मार्गांचा वापर करण्यात येतो. दहिसर, ऐरोली, वाशी, आनंद नगर (मुलुंड) आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग (मुलुंड) या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोल नाके आहेत. मुंबईत बांधलेल्या 55 उड्डाणपुलाच्या उभारणीचा खर्च वसूल करण्यासाठी हे टोलनाके उभारण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या एमईपी कंपनीच्या करारानुसार 2002 ते 2027 अशा पंचवीस वर्षांसाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल वसूल करण्यात येणार आहे. तसेच दर तीन वर्षांनी या टोलच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची तरतूद या करारात आहे. त्यामुळेच 2017 नंतर आता 2020 मध्ये टोल दर वाढ केली जात आहे.

एक ऑक्टोबरपासून या टोलचे नवीन दर लागू होतील. त्यानुसार कार, जीपसारख्या चारचाकी हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने, त्यांना 35 रुपयांच्या ऐवजी चाळीस रुपये टोल द्यावा लागेल. मिनी बससारख्या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन तो 55 रुपयांवरून 65 रुपये करण्यात आला आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात 105 वरून 130 अशी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल 135 रुपयांवरून 160 रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे. केवळ एका टोलसाठी असलेला मासिक पास आता 1240 रुपये करण्यात आला असून पाचही टोल नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांऐवजी 1500 रुपये होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *