भरचौकात तरुणाची हत्या; डोळ्यांत चटणी फेकली, तलवारीने केले 16 वार

कोल्हापूर क्राईम

कोल्हापूर: भर चौकात तरुणाला अडवले. गाडी थांबवताच त्याच्या डोळ्यात हल्लोखारांनी चटणी फेकली. काय झालं कळायच्या आतच दोघांनी त्याच्यावर तलवार आणि चाकूने सपासप वार केले. तलवार आणि चाकूने 16 वार केल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्याच्या किंकाळ्या ऐकून लोक चौकात धावले. त्यांना पाहून मारेकर्‍यांनी तेथून पोबारा केला. या हल्ल्यात आकाश विनायक सोनुले उर्फ मॅनर्स या 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वसाहतीतील वर्चस्व वादातून हा खून झाल्याचे समजते. कागल येथील महात्मा फुले वसाहतीमधील महालक्ष्मी चौकात आज, शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
कागल येथील महात्मा फुले वसाहतमध्ये गेल्या काही वर्षांपासून वर्चस्वासाठी दोन गटात वाद धुमसत आहे. यातूनच आकाश सोनुले याच्यावर दुपारी हा हल्ला झाला. दुपारी 2 वाजता तो जेवायला घरी निघाला होता. महालक्ष्मी मंदिरासमोर दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते. तो चौकात येताच त्यांनी त्याला अडवले. त्याची गाडी थांबताच एकाने त्याच्या डोळ्यात चटणी फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्याने आकाश घाबरला. डोळे चोळत असतानाच दोघांनी तलवार व चाकूने त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. डोळ्यात चटणी टाकल्याने त्याला कोणताही प्रतिकार करता आला नाही. सपासप वार झाल्याने तो गाडीवरून खाली कोसळला. त्याच्या आर्त किंकाळीने शेजारी राहत असलेले अनेकजण मदतीला धावले.
अनेक वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. लोक येताच त्या दोघांनी तेथून पोबारा केला. तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी रूग्णालयास नेण्यात आले. पण अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक तिरूपती काकडे व प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या प्रकरणी सायंकाळी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *