दिवाळी सणातील ST ची हंगामी तिकीट दरवाढ रद्द, सर्वसामान्यांना दिलासा

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाच्या हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्याच्या निर्णयाला राज्य परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे.राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनुसार, यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून 30 टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत.

त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये, म्हणून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे.

गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या ‘प्रवासी देवो भवः’या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असं मंत्री परब यांनी सांगितले.

दुसरीकडे,  ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकीत वेतन मिळावे, यासाठी परिवहनमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटनांच्या प्रतिनिधींना दिलं आहे.

एसटी कामगारांच्या थकीत वेतनाच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमत ताटे यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवारांनी आश्वासन दिल्याचे एसटी संघटना प्रतिनिधींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *