मंगळवेढा : अमावास्येच्या तोंडावर सोन्याच्या हंडयाच्या मोहापायी सुरु होते खोदकाम
प्रकरणी तीघांची पोलिसांकडून कसून चौकशी
मंगळवेढा(प्रतिनिधी )ः मंगळवेढा शहरातील इंगळे गल्लीत एका जुन्या वाडयात अमावास्येच्या तोंडावर सोन्याचा हंडा असल्याच्या पार्श्वभूमीवर तिघेजण खोदकाम करीत होते.या आवाजाने गल्लीतील नागरिक खडबडून जागे झाले.त्या आवाजाच्या दिशेने वाडयात डोकावून पाहिले असता एका मांत्रिकासह अन्य दोघे खड्डा खोदून त्याची पूजा अर्चा करीत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून त्या तीघांना ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविला.
या घटनेची हकिकत अशी,शहरातील इंगळे गल्लीत अनेक वर्षापासून बंद स्थितीत जुना वाडा आहे. दि. 18 रोजी सकाळी 11.00 वा. या वाडयात मंगळवेढा येथील एक स्थानिक व्यक्तीसह,श्रीगोंदा येथील एक व्यक्ती तर दुसरी व्यक्ती अहमदनगरची आहे. असे तिघेजण सोन्याचा हंडा असल्याच्या संशयाने खोदाई करीत होते. खोदकामाचा बंद वाडयातून मोठयाने आवाज येत असल्याने वाडयाच्या शेजारील नागरिकांना आवाजाचा संशय आला.सगळे लोक घराबाहेर धावले व त्यांनी घरावर चढून वाकून पाहिले असता अंदाजे 3 बाय 3 चा 5 फुट खोलीचा खड्डा दिसून आला. त्या शेजारी नारळ फोडल्याचे व हळद-कूंकू व इतर विधीचे साहित्य पडल्याचे दृष्टीस आले.हा वाडा अनेक वर्षापासून कुलूपबंद अवस्थेत आहे.या मांत्रिकाने वाडयाच्या बाहेर एका व्यक्तीस नजर ठेवण्यासाठी उभे केले होते.दार लावून आत विधीचा कार्यक्रम सुरु होता.नागरिकांनी पोलिस स्टेशनला तक्रार केल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येवून तीघांना पोलिस स्टेशनला घेवून गेले तर बाहेर नजर राखत उभा असलेली ती व्यक्ती मात्र फरार होण्यात यशस्वी झाली. पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी या तीघांकडे कसून चौकशी केली.त्यामध्ये एक श्रीगोंदा तर दुसरा अहमदनगरचा असून अन्य एक स्थानिक असल्याचे चौकशीत सांगितले.दि. 20 रोजी अमावास्या असल्याने अमावास्येच्या तोंडावर सोन्याचा हंडा असल्याच्या संशयावरून ही खोदाई सुरू असल्याची माहिती या घटनेत पुढे आली आहे.
नंदूर व माचणूर येेथे दीड वर्षापुर्वी नरबळीचा प्रकार अमावास्येच्या तोंडावर घडला होता. माचणूर येथील प्रकरण अदयापही ताजे असताना सोन्याच्या हंडयाच्या हव्यासापोटी अंधश्रध्देतून खोदाईचे काम सुरु असल्याने लॉकडाऊन असतानाही बाहेरच्या जिल्हयातून मांत्रिकाने येण्याचे धाडस केलेच कसे असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे. सदर गल्लीतील 14 व्यक्तींनी सह्या करून स्थानिक व्यक्तीच्या नावे या तक्रारीचे निवेदन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हॅटसअॅपव्दारे डी.वाय.एस.पी.व पोलिस निरिक्षक यांचेकडे पाठविले आहे. या निवेदनात सदर जुन्या वाडयात खोदाईचे काम चालू होते. त्या ठिकाणी भगवे कपडे,हळदी कूंकू,नारळ,रवी आदी साहित्य असल्याचे निवेदनात नमूद करून ही खोदाई अंधश्रध्देपोटी झाल्याचे म्हणून चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरातील इंगळे गल्लीतील जुन्या वाडयात खोदाईचा प्रकार झाला याबाबत तेथील नागरिकांनी व्हॅटसअॅपवर कारवाईने निवेदन पाठविले आहे.प्रत्यक्षात कोणीही तक्रार दयावयास आले नाही.प्रत्यक्षात तक्रार दिल्यानंतर चौकशी करून संंबंधितावर कारवाई करण्यात येईल.
जोतीराम गुंजवटे,पोलिस निरिक्षक मंगळवेढा.