मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करुन नव्या अध्यक्षाची निवड करा : सोनिया गांधी

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी . वेणुगोपाळ यांनी सोनिया गांधी यांची इच्छा असलेलं एक पत्र वाचून दाखवलं. त्यामध्ये सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, ‘मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नव्या अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करावी.’

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारावीत, अशी विनंती सोनिया यांनी केली. देशातल्या काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष मिळावा, अशी मागणी केली. या पत्रातून अप्रत्यक्षपणे नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. या पत्रावर मनमोहन सिंग आणि ए. के. अँटनी यांनी कार्यकारणी समितीच्या बैठकीत जोरदार टीका केली आहे.

पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांची भूमिका काय?

या सगळ्या घडामोडींनंतर सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राहुल गांधी यांना मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, त्याने लोकांना भेटावे, कोणताही इश्यू असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल, पक्ष संघटनेला वेळ द्यावा. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेतला तर चांगली गोष्ट, आता हंगामी अध्यक्ष आहे त्याऐवजी पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, सोनिया गांधी यांनी ती जबाबदारी स्वीकारली तरी पाठिंबा, राहुल गांधी यांनी स्वीकारली तरी पाठिंबा आहे,” असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज सकाळी 11 वाजता सुरु झाली आहे. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झालंय, नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. दरम्यान, सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहे. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीची आजची बैठक वादळी ठरणार अशी दाट शक्यता दिसत आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सुरु असलेला पेच तातडीने संपवावा, अशी मागणी पक्षातूनच व्हायला लागली आहे. पक्षातल्या 23 नेत्यांनी त्याबाबत सोनिया गांधी यांना लिहिलेल्या एका पत्राचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचा वाढता विस्तार आणि युवकांनी मोदींना दिलेली साथ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत असून तातडीने तळापासून मोठ्या बदलांची आवश्यकता असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *