१९,५०० कोटी रुपये: ९.७५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकारकडून पैसे जमा

0
79

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सरकारच्या पीएम-किसान योजनेअंतर्गत ९.७५  कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे १९,५०० कोटी रुपये हस्तांतरित केले. सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांचे नऊ हप्ते दिले आहेत. रक्कमेचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशभरातील या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तेलांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी एका योजनेची घोषणा केली.

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेची घोषणा २०१९च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मदतनिधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

पाम तेलासह स्वयंपाकाच्या तेलांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी मोदींनी नॅशनल एडिबल ऑईल मिशन-ऑईल पाम या योजनेची घोषणा केली. यावेळी तेलाच्या बाबतीत आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर त्यांनी भर दिला. “भारत तांदूळ, गहू आणि साखरेच्या उत्पादनात स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर झाला आहे, परंतु हे पुरेसे नाही. कारण आपण खाद्यतेलांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहोत.”असे ते म्हणाले

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीतील या व्हर्चुअल कार्यक्रमाला संबोधित करताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, नवव्या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत तब्बल ११ कोटी लाभार्थ्यांना सुमारे १.३७ लाख कोटी रुपये वितरित केले होते. सरकारने २.२८ कोटी लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडले आहे. त्याअंतर्गत हे लाभार्थी आतापर्यंत २.३२ लाख कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकले आहेत.

“करोना काळातील आव्हानांना न जुमानता शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे येत्या काळातही देशाला शेतीतून चांगले उत्पादन अपेक्षित आहे,” असे कृषी मंत्री तोमर म्हणाले. तर देशातील खाद्यतेल आणि डाळींच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, “सरकार विविध योजना राबवून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here