राज्यभरात अनेक जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण; उद्यापासून शाळा सुरु होणार?

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच शाळा सुरु करण्याचा निर्णय पूर्णतः स्थानिक प्रशासनावर अवलंबून असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई, पुणे, औरंगाबादपाठापोठ आता नाशिकमधीलही शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय त्यात्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. परंतु शाळा सुरु करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. अनेक जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल समोर आले आहे. त्यानुसार, राज्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. अशातच आता शिक्षकांनाच कोरोनाची लागण झाल्यानंतर शाळा सुरु करण्याच निर्णय कितपत योग्य असेल असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर तर दुसरीकडे 23 तारखेपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्याचे पूर्वीचे आदेश असल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी केली जात असून त्यात अनेक शिक्षक पॉझिटिव्ह आढळत असल्याचं समोर आलं आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह?

सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागांतील 178 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत, तर सोलापूर शहरात आतापर्यंत प्राप्त झालेले सर्व 330 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागात जवळपास 10 हजार 799 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पंढरपूर तालुक्यातील 66 शिक्षक, मंगळवेढा तालुक्यातील 22, सांगोला 21, माळशिरस 20, बार्शी 15 शिक्षकांचे अहवाल पॉसिटीव्ह प्राप्त झाले आहेत. तर सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 1199 जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 330 जणांचे
अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिकमधील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. 4 जानेवारी पासून नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या आजच्या बैठकीत घेण्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. तर उद्यापासून शाळा सुरु करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी सुरु करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 45 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीणमध्ये 37 तर नाशिक शहरात 8 शिक्षक पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नागपूर जिल्ह्यात शाळा उघडण्यापूर्वी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल समोर आले आहेत. अशातच जिल्ह्यात आतापर्यंत 41 शिक्षक कोरोना पॅाझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. ग्रामीण भागांत 25 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूर शहरात 16 शिक्षकांचे रिपोर्ट पॅाजिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 6823 शिक्षकांच्या RTPCR चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करावा : मराठवाडा शिक्षक संघाची मागणी

सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. परळीचे तालुका सचिव बंडू आघाव यांनी राज्य सरकारकडून शाळा सुरु करु नयेत अशी मागणी केली आहे. शाळा सुरु करुन विनाकारण कोरोनाला निमंत्रण देऊ नये. शाळा सुरु केल्या तरी पालक आपल्या पाल्याला आताच्या परिस्थितीत शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा आणि शिक्षण सुरु ठेवावे.

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाचा : वर्षा गायकवाड

‘शाळा सुरु करण्याचा निर्णय मी स्थानिक प्रशासनावर सोडला होता. अजूनही माझ्या बैठका चर्चा सुरु आहेत. ज्या ठिकणी तयारी झाली त्या ठिकाणी शाळा 23 नोव्हेंबरला सुरु कराव्यात. तसेच, ज्या ठिकाणी तयारी झालेली नाही, त्या ठिकणी स्थानिक प्रशासन परिस्थिती पाहून निर्णय घेईल. आता नाशिकमध्ये शाळा सुरु करणार आहे. पुण्यातही माझी चर्चा सुरु आहे.’, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. ‘पालकांची संमतीसुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे त्यांचासुद्धा विचार यामध्ये घेण्यात येणार आहे. मुंबई सोडून सर्व ठिकाणी शाळा या 23 नोव्हेंबरला सुरु होत आहेत. कारण ऑनलाइन माध्यमातून शिक्षण सर्वांना मिळत नाहीये, त्यामुळे शाळा सुरु करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर स्थानिक प्रशासनाला वाटत असेल शाळा सुरु करणं आता शक्य नाही ते पुढे ढकलावं तर ते अधिकार त्यांना देण्यात आलेल्या गाईडलाइन्समध्ये नमूद करण्यात आले आहेत.’, असंही वर्षा गायकवाड यांनी बोलताना सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *