मुंबई : कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा महाराष्ट्राभोवती वाढू लागला आहे. राज्यातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी भयावह आहे. कोकण, विदर्भ, मुंबई अशा अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील विविध जिल्हा प्रशासनाकडून अनेक जिल्ह्यात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. दरम्यान सामान्य नागरिकांनी स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचीही काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाता विळखा रोखायचा असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासह इतर महत्त्वाच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारयांनी देखील सोशल मीडियावर असाच एक संदेश सामान्यांना दिला आहे. सोशल डिस्टन्सिंगचं महत्व त्यांनी यातून पटवून दिलं आहे.
शरद पवारांनी ट्वीट करून सांगितलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व
मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये त्यांनी हे ट्वीट केलं आहे. यात शरद पवारांनी असं म्हटलं आहे की, ‘सोशल डिस्टन्सिंगची ताकद, योग्य काळजी हाच उपाय’. असं कॅप्शन देत शरद पवारांनी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत नमुद करण्यात आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रत्यक्षात सरकार, नेते मंडळी, एनजीओ, महापालिका इ. कडून कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. आणि सध्या या जनजागृतीची अतिशय आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी वाढणारी आहे. दिवसभारत हजारोंच्या संख्येने रुग्णात वाढ होते आहे.
याआधी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील SMS अर्थात सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक ट्वीट सीरिज पोस्ट करत राज्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती मांडली होती आणि नागरिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन देखील केले होते.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6100 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात आढळून आलेले नवीन कोरोना रुग्ण हे गेल्या 84 दिवसांतील सर्वाधिक रुग्ण आहेत. तर गेल्या चोविस तासातील मृतांची आकडेवारी ही 15 दिवसातील सर्वाधिक आहे.