माध्यमिक शाळांतील इयत्ता 5 वीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणार, शासन निर्णय

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : आता माध्यमिक शाळांतील इयत्ता 5 वी चा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार व इयत्ता 5 वी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांचे समायोजन प्राथमिक शाळांमध्ये केले जाणार आहे. याबाबत काल शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर करून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता प्राथमिक शाळा ही इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीपर्यंत असणार आहे. तर माध्यमिक शाळेचा प्रवेश आता इयत्ता सहावीपासून घेता येणार आहे. याआधी राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 5 वी, इयत्ता 6 वी ते 8 वी व 9 वी ते 10 वी अशा तीन गटांमध्ये विद्यार्थी विभागले गेले होते. यामध्ये इयत्ता 5 वी हा एकाच वर्गाचा स्वतंत्र गट तयार झालेला होता. या गटाला माध्यमिक शाळांमध्ये प्राथमिक शाळांचे शिक्षक कार्यरत होते. त्यामुळे आता या शिक्षकांचा समायोजन हे प्राथमिक शाळांमध्ये केलं जाईल.

आरटीई अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार ग्रामीण भागात, वाड्या, वस्ती या ठिकाणी इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यत शिक्षण 1 किमी परिसरात देणे आवश्यक आहे. त्यामुळे इयत्ता 5 वी हा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे. त्यामुळे 5 वी च्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सुद्धा कमी प्रवास करून घरच्या जवळ शाळा उपलब्ध करून इयत्ता 5 वी पर्यंत शिक्षण घेता येणार आहे. इयत्ता 5 वी वर्ग प्राथमिक शाळांमध्ये जोडताना हे काम टप्याटप्याने व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली केलं जाईल. शिवाय, इयत्ता 5 वर्गाला प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचे समायोजन जवळच्याच प्राथमिक शाळेत करण्यात यावे, अशा सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांचे समायोजन करताना, त्याच शाळेत ते होत नसल्यास त्याच संस्थेअंतर्गत सुरु असलेल्या इतर अनुदानित शाळेत करता येणार आहे. जर त्या संस्थेत शक्य नसेल तर दुसरा प्राधान्यक्रम म्हणून शिक्षकांचे समायोजन अन्य खाजगी अनुदानित संस्थेत करता येणार आहे. अन्यथा तिसरा पर्याय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिक्षकांचे समायोजन शाळांना करता येणार असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मात्र अंशतः अनुदानित शाळेतून पूर्णतः अनुदानित शाळेत हे समायोजन शाळांना करता येणार त्यामुळे शासनावरील आर्थिक बोजा वाढणार आहे असे ही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोविड काळात समायोजनाच्या या होणाऱ्या ससेहोलपटीमुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

सदर शासन आदेश काढून शासनाने पुन्हा एकदा शाळांची फसवणूक केली आहे, सदर वर्गावर आजतागायत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना कोठेही सुरक्षिततेची हमी नाही.त्याबरोबर ज्या शाळा आता 5 वी ते 10 वी आहेत, त्यांना नियमानुसार आता इ 6 वी ते 12 वी अशी मंजुरी मिळायला हवी, मात्र त्याबाबत काहीही कार्यवाही नाही, तरी आगामी नवे शैक्षणिक धोरण व त्यातील तरतुदी पाहून सर्वसमावेशक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले. तर हा निर्णय गुंतागुंतीचा ठरणार असून नवे शैक्षणिक धोरणाचा विचार करून त्यात जे टप्पे दिले आहेत त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल त्यासाठी वाट पाहून हा निर्णय रद्द करण्यात यावा. शिवाय, यामध्ये शिक्षकांचे समायोजन कसे करणार हा सुद्धा प्रश्न निर्माण होणार असल्याचे भाजप शिक्षक आघाडीचे संयोजक अनिल बोरनारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *