‘शाहरुखमुळं आज मला गाता येतं’; शिल्पा शेट्टीनं सांगितला बाजीगरमधील किस्सा

ताज्या घडामोडी देशविदेश मनोरंजन

मुंबई : ‘बाजीगर’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. 1993 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही आपल्या दमदार कथानकामुळं चर्चेत असतो. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान , अभिनेत्री काजोल आणि शिल्पा शेट्टी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. शिल्पा त्यावेळी केवळ 17 वर्षांची होती. तिच्याकडे अभिनयाबाबत फारसा अनुभव नव्हता. त्यावेळी शाहरुख खान तिच्या मदतीला धावून आला. बाजीगरच्या चित्रीकरणाच्या वेळी शाहरुखनं केलेल्या त्या लाखमोलाच्या मदतीचा किस्सा शिल्पानं सांगितला. हा किस्सा ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

शिल्पानं आलिकडेच सुपर डान्सर चॅप्टर 4 या रिअलिटी शोचं प्रमोशन करण्यासाठी इंडियन आयडल या संगीत शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा बाजीगरमधील किस्सा सांगितला. बाजीगर हा शिल्पाचा पहिलाच चित्रपट असल्यानं तिला खूपच दडपण आलं होतं. पण शाहरुख खान नेहमी तिला दिलासा देत असे. तिचे सीन चांगले व्हावेत म्हणून मदत करत असे, अशी आठवण शिल्पानं या वेळी सांगितली. यात शिल्पा आणि शाहरूखची दोन गाणी आहेत. त्यापैकी ‘ए मेरे हमसफर ….’ या गाण्याचं शूटिंग सुरू असताना तिला गाण्याच्या शब्दानुसार ओठांच्या हालचाली करायच्या होत्या; पण काही केल्या तिला ते जमत नव्हतं. त्या वेळी शाहरुखनं तिला लिपसिंक कसं करायचं याचं टेक्निक सांगितलं.

बाजीगर चित्रपटात शिल्पानं सीमा चोप्रा ही भूमिका साकारली होती, तर शाहरुख खान अजय शर्माच्या भूमिकेत होता. सीमाचे वडील मदन चोप्रा यांनी केलेल्या आपल्या आई -वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो सीमाबरोबर प्रेमाचं नाटक करतो आणि नंतर तिला एका इमारतीवरून ढकलून देऊन तिची हत्या करतो. नंतर तिची बहिण काजोल याचा शोध घेते असं याचं कथानक होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *