डिसेंबरमध्येच मिळेल परवानगी, जानेवारीपासून कोरोना लशीकरण; पुणेरी लशीबाबत पूनावाला यांनी दिली खूशखबर

ताज्या घडामोडी देशविदेश

सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रत्येक नागरिकाला पुरण्याएवढ्या कोरोना लशी उपलब्ध होतील आणि सर्वसामान्य आयुष्य सुरळीतपणे सुरू होईल, अशी आशा पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनी व्यक्त केली आहे.

पुणे : कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. लस उत्पादक कंपन्यादेखील लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यूकेमध्ये कोरोना लशीचा आपात्कालीन वापर सुरू झाल्यानंतर भारतातही तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया . सीरमनं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी  ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच DCGI कडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल अशी खूशखबर अदार पूनावाला यांनी दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने विकसित केलेली कोरोना प्रतिबंधक लस तातडीने वापरण्याची परवानगी डिसेंबरअखेरपर्यंत मिळण्याबद्दल संस्थेचे सीईओ आदर पूनावाला आशावादी आहेत. “आम्हाला इमर्जन्सी लायसेन्स (Emergency License) चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल; पण लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो, असा विश्वास आम्हाला आहे”, असं अदार पूनावाला यांनी सांगितलं.

सुरुवातीला देशाच्या किमान 20 ते 30 टक्के लोकसंख्येला लस देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियोजन करत आहे. तेवढा टप्पा पार पडल्यावर आपल्याला समाजात आत्मविश्वास दिसू लागेल, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. सरकारला जुलै 2021 पर्यंत लशीचे 30 ते 40 कोटी डोस हवे असल्याचंही पूनावाला यांनी नमूद केल्याचं ‘मनीकंट्रोल डॉट कॉम’च्या बातमीत म्हटलं आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रत्येक नागरिकाला पुरण्याएवढ्या लशी उपलब्ध होतील आणि आपलं नेहमीचं जीवन (Normal Life) सुरळीतपणे सुरू होईल, अशी आशाही पूनावाला यांनी व्यक्त केली.

सरकारी, तसंच खासगी क्षेत्रालाही पुरतील एवढ्या डोसची निर्मिती करण्याची तयारी सीरम इन्स्टिट्युट करत असल्याचं पूनावालांनी स्पष्ट केलं. तसंच, कोविड-19 लशीच्या निर्मितीसाठी नोव्हावॅक्स (Novavax) कंपनीसोबत करार केल्याचंही त्यांनी सांगितलं. 2021च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत नोव्हाव्हॅक्सच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या (Clinical Trials) पूर्ण होण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

अर्थात असं असलं, तरी प्रत्यक्षात या वेळापत्रकानुसार सारं कसं होतं हे पाहण्याशिवाय पर्याय नाही. एका दिवशी एका लशीकरण केंद्रावर केवळ 100 जणांनाच लस देण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहेत.

आतापर्यंत भारतात कोविड-19च्या 98 लाख 26 हजार 775 एवढ्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी एक लाख 42 हजार 628 जणांचा मृत्यू झाला आहे. 93 लाख 24 हजार 328 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगते. सध्या देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची (Active Corona Patients) संख्या तीन लाख 59 हजार 819 एवढी आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 3.66 टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचं भारतातलं प्रमाण (Recovery Rate) वाढत असून, सध्या हे प्रमाण 94.74 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 10 लाख 65 हजार 176 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *