भाजपने घाणरेडे राजकारण केले : संजय राठोड

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोडयांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. या प्रकरणी भाजपने घाणरेडे राजकारण केले आहे, अशी टीका संजय राठोड यांनी केली.

‘मी माझ्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाण हीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यबद्दल भाजपने अत्यंत घाणरेडे राजकारण केले आहे. माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली आहे. माझी राजकीय कारकीर्द बरबाद करण्याचे काम करण्यात आले आहे’ असं संजय राठोड म्हणाले.

‘पूजा चव्हाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, जे काही सत्य आहे ते समोर आले पाहिजे, ही माझी पहिल्यापासून हीच भूमिका होती. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे. उद्या आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, अशी भाषा वापरणे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राजघटनेचा अवमान आहे,’ अशी टीकाही संजय राठोड यांनी केली.

गेल्या 20 दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. दुसरीकडे, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर येऊन ठेपल्यामुळे ठाकरे सरकारपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती.

आज सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावाच लागणार हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास संजय राठोड हे आपल्या पत्नीसह वर्षा बंगल्याकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा सोबत ठेवला होता.

वर्षा बंगल्यावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात चर्चा झाली. राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. ‘मी राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्या. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा’ अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पण, मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम होते.

त्यानंतर एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांच्यात चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राठोड यांची बाजू घेतली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसून जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि संजय राठोड यांच्यामध्ये वेगळ्या खोलीमध्ये चर्चा झाली. त्यावेळी राजीनामा मंजूर करू नये, अशी विनंती राठोड यांनी केली. एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी सुद्धा हीच भूमिका मांडली होती. पण, विरोधक आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे उद्धव ठाकरे नाराज होते. त्यामुळे तडकाफडकी उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *