मुंबई : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12000 हून अधिक नोंदवली गेली आहे. त्यात अनेक सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच अभिनेता संजय दत्त याला लीलावती रुग्णालयात भर्ती केल्याची बातमी समोर आली आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय दत्त याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णालयात अधिक तपासणी केल्यानंतर त्याला होत असलेल्या त्रासाचं निदान करण्यात येईल. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटनुसार सध्या संजय दत्त याची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही काळ त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. लीलावती व्यवस्थापकांकडून संजय दत्त याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.