टेंभुर्णी प्रतिनिधी :
टेंभुर्णी शहर व परिसरामध्ये वाळूमाफियांनी प्रचंड हैदोस घातला असून शेवरे तसेच नदीपात्रातील इतर गावाच्या शिवारातून दररोज १० ते २० मोठ्या ट्रकद्वारे व छोटा हत्ती द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची वाहतूक सुरू आहे. यामुळे टेंभुर्णी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे.या वाळू माफियांना महसूल व पोलिसांचा आशीर्वाद असल्याने राजरोसपणे वाळूचोरी सुरू असल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे. गेल्या काही काळापासून वाळू उपसा बंद होता परंतु काही महिन्यापासून पुन्हा वाळूमाफियांनी डोके वर काढले असून शेवरी व नदीपात्र शेजारील इतर गावाच्या शिवारातून दररोज १० ते २० मोठे ट्रक तसेच ट्रॅक्टर, छोटा हत्ती द्वारे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे. तसेच शेजारील तालुक्यातील काही गावांमधून धरणातील वाळू ही टेंभुर्णी शहरामध्ये व परिसरामध्ये पाठवली जात आहे. यांत्रिक बोटी व जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचा उपसा केला जातो. वाळूमाफिया रात्रीतून लाखो रुपये कमवत आहेत. व त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयाचे महसुलाचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही वाळूचोरी कोण रोखणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने सर्वच नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊन गेला आहे. त्यामुळे नदीपात्रात सर्वत्र वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे. तसेच वाळू तस्करी मध्ये परिसरातील झिरोंचा ही समावेश असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकरणाकडे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांनी गांभीर्याने लक्ष घालून ही वाळूचोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील नागरिकांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून वाळूची अवैध व अमाप उपसा सुरूच असून तक्रारी झाल्यानंतर थातुरमातूर कारवाई करून दंड वसूल केला जातो. ठोस स्वरुपाची कारवाई होत नसल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.