मुंबई : सोन्या-चांदीचे दर फेब्रुवारीपासून तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतातर सोनं खरेदी करणं आवाक्या बाहेर जाणार का अशी भीती आहे. गणपतीच्या आगामनाआधी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. 15 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत जवळपास सोन्याच्या दरात 8 हजार रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सोमवारी सकाळी बाजार उघडताच 24 कॅरेट 1 तोळे सोन्याची किंमत 55 हजार 020 रुपये एवढी आहे. सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला नवी झळाळी मिळाली आहे. वायदा बाजारात 0.42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे दरानं पंचात्तरी गाठली आहे.
मुंबईतील सोन्याचे दर
15 जुलै 2020- 50,850
20 जुलै 2020- 50,935
24 जुलै 2020- 52,835
29 जुलै 2020- 55, 040
3 ऑगस्ट 2020- 55,900
7 ऑगस्ट 2020- 58,015
सोमवारी वायदा बाजार चांदीचे भाव 960 रुपयांनी वाढले असून 75,120 रुपये किलोग्रॅमवर किंमत पोहोचली आहे. येत्या काळात सोन्याचे दर आणखीन वाढणार असून प्रति 10 ग्रॅमसाठी 70 ते 75 हजार रुपये मोजावे लागू शकतात असा अंदाज आहे.
का वाढल्या सोन्याचांदीच्या किंमती?
कोरोनामुळे 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये उसळी आल्यामुळे त्याचा परिणाम देशातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे.