सुशांतच्या घरचे CCTV फुटेज तपासणार, महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता

क्राईम महाराष्ट्र

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वासाठी मोठा धक्का होता. त्याचे कुटुंबीय तर कोलमडून गेले आहेत. दरम्यान या घटनेच्या तब्बल 40 दिवसांनतर सुशांतचे वडील केके सिंह यांनी याप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली. पाटणामध्ये ही एफआयआर दाखल केल्यामुळे आता पाटणा पोलीसही मुंबईत येऊन प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत. यामध्ये रोज नवीन घडामोडी समोर येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता पाटणा पोलीस एका वेगळ्या अँगलने याप्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान नुकतीच अशी माहिती समोर येत आहे की, सुशांतच्या मुंबईच्या वांद्रे येथील घराचे सीसीटीव्ही फुटेज पाटणा पोलीस ताब्यात घेणार आहे. सीसीटीव्ही फुटेजबाबत सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान पाटणा पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुशांतच्या नोकराने अशी माहिती दिली होती की, त्याच्या मृत्यूच्या आधी घरामध्ये कोणतीही पार्टी झाली नव्हती. दरम्यान या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीतरी दडून बसल्याचा संशय पाटणा पोलिसांना आहे. या CCTV कॅमेराच्या फुटेजमधून काहीतरी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. पोलीस टीममधील एका अधिकाऱ्याने न्यूज18 ला ही माहिती दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या राजकारणावरून  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भाजपला फटकारले आहे. ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस हे चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहे. जर कुणाकडे काही पुरावे असेल तर त्यांनी ते मुंबई पोलिसांकडे सोपवावे, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नये’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

याआधी शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात मनी लाँड्रिंगचा विषय समोर आल्याने ईडीने लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे काही भाजप नेत्यांनी असा आरोप केला होता की, या प्रकरणात महाराष्ट्रातील एका युवा नेत्याला पाठिशी घालण्याचा प्रकार यातून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *