वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मोहोळमध्ये 32 वर्षीय इसमाचा मृत्यू

ताज्या घडामोडी सोलापूर

मोहोळ :             रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचाराअभावी ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार ३० जुलै रोजी मोहोळ शहरात घडली. देविदास वाघमोडे राहणार नजीक पिंपरी तालुका मोहोळ असे मृत इसमाचे नाव आहे.  याबाबत ज्योती क्रांती परिषदेच्यावतीने मोहोळ शहरासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.       मोहोळ हे सोलापूर पुणे व पुणे विजापूर या महामार्गावरील महत्वाचे शहर असून तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या ४०-४५ आजारांच्या आसपास आहे. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातून  विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या देखिल लक्षणिय आहे. मात्र मोहोळ शहर व तालुका दर्जेदार आरोग्य सेवेपासून वंचित राहिलेला आहे. शहरासह तालुक्यात कोठेही मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्स नाहीत. ग्रामीण रुग्णालय देखील  अपुऱ्या सोयीसुविधा आहेत. त्यामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी सोलापूर अथवा पंढरपूर सारख्या ठिकाणी जावे लागते.   

शासनाची १०८ रुग्णवाहिका कॉल वर असल्यास ती उपलब्ध होईपर्यंत  पेशंट दगावण्याची शक्यता देखील असते. मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सिव्हिल सर्जन सोलापूर यांच्याकडे मोहोळ साठी स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी म्हणून पाठपुरावा करण्यात आला आहे मात्र सिव्हिल सर्जन यांनी या मागणीकडे अद्यापर्यंत कानाडोळा केल्याचे दिसत आहे. गुरुवार ३० जुलै रोजी नजीक पिंपरी येथील देविदास वाघमोडे यांना पोट दुखीचा त्रास होऊ लागल्याने ते मोहोळ  शहरात उपचारासाठी आले होते. दरम्यान वैद्यकीय क्लिनिकच्या बाहेरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी डॉक्टर समाधान गावडे यांच्यासह ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश प्रवक्ते शीलवंत क्षीरसागर यांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका व ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने रुग्णवाहिकेला संपर्क केला असता एक ते दीड तासाचा अवधी लागेल असे सांगण्यात आले. तोपर्यंत देविदास वाघमोडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.         या दुर्दैवी घटनेमुळे शहर व तालुक्याच्या आरोग्य सेवा व व्यवस्थेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मोहोळ ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाने त्वरित स्वतंत्र रुग्णवाहिका द्यावी अशी मागणी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश प्रवक्ते शीलवंत क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतच्या निवेदनाच्या प्रती मोहोळ तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मोहोळ व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी युवक जिल्हा कार्याध्यक्षक सागर अष्टुळ, बाळासाहेब माळी, गणेश राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *