लाखो रुपयाचा महसूल अधिकाऱ्याच्या खिशात वसुलीसाठी ३३ दलाल
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात ओव्हरलोड ट्रक व इतर वाहने बेकायदेशीर चालविण्यास पाठींबा देऊन लाखो रुपयांचा शासनाचा कर आरटीओच्या गलेलठ्ठ अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे. जिल्ह्यात सुमारे ३३ दलालांच्या माध्यमातून शेकडो ओव्हरलोडेड वाहने सर्रास धावत आहेत.यावर कारवाई न करता त्यांच्याकडून हप्ते घेऊन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल शासकीय नोकरीत असलेल्या आरटीओच्या खिशात जात आहे. वसूलीसाठी सोलापूर येथील आरटीओ कार्यालयात शिं आणि दे नावाचा अधिकारी कार्यरत आहे या अधिकाऱ्याने अवैध रूपाने लाखों रुपये कमाविले असल्याचे चर्चा आरटीओ कार्यालयात आहे. मुंबई पोलीस दलातील वाझे ज्या प्रकारे वसूली करत होता त्याच प्रकारचा फंडा हा शिं आणी दे नावाचा अधिकारी पंटर लावून करत आहे. तो पंटरच्या माध्यमातून महिन्याकाठी लाखों रुपये गोळा करत आहे.
आरटीओला जेवढे उत्पन्न शासकीय दंड वसूली व शासकीय कामांच्या प्रक्रियेतून मिळते त्यापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न वरकमाईतून मिळते. हे उत्पन्न उघड नसले तरी हे सत्य आहे. जिल्ह्यातून शेकडो ट्रक दररोज ये जा करतात सोलापूर येथे कारखानदारी, वाळ वाहतूक, एमआयडीसी, आदी उद्योगाच्या माध्यमातून सोलापुरात उलाढाल मोठी आहे. एवढेच नव्हे तर सोलापूर व राज्यभरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे त्यामुळे चेकपोष्टवरून ये-जा करणाऱ्या ट्रक व इतर वाहनांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरून देखील मोठ्या प्रमाणावर ट्रकची वाहतूक सुरू असते. त्यात ओव्हरलोड वाहतुकीचे प्रमाण देखील मोठे आहे. असे असतानाही आरटीओ विभागातील एकही अधिकारी या वाहनांवर कधीही कारवाई करीत नाही. साधे वजन काट्यावर नेहून मोजणी देखील या वाहनांची कधी करण्यात येत नाही केलीच तर नावापुरती मोजकी कारवाई केली जाते ते रेकार्डवर दाखवण्यासाठी सर्व प्रकार केला जातो, हे सत्य आहे. या सर्व रॅकेटमध्ये कनिष्ठापासून वरिष्ठांची साखळी कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. सोलापुरात सुरू असलेला सर्व प्रकार मात्र विशेष म्हणजे बडे अधिकारी देखील डोळस पणे आहेत. खालपासून वरिष्ठ अधिकारी मालामाल झाले आहेत. या सर्वाच्या मालमत्तेचा चौकशी केल्यानंतर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकरता येत नाही.
………………
कोडवर्डचा फंडा
यातील कोणतेही वाहन पकडले तरी लागलीच नंबर पाहून ते वाहन सोडण्यात येते. या दलालांचे कोडवर्ड देखील रंजक आहेत. रावेर मोटार, डीटीसी, भोळे मामा अशा विविध नावांनी थेट नंबरच्या याद्याच या बुकलेटला लावलेल्या आहेत. विशेष म्हणजे या दलालांचे नंबर देखील या याद्यांवर आहेत. वाहन पकडल्यानंतर लागलीच वाहन सोडविणे सोपे जाण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे.
………………………
बुकलेटचा वापर
आरटीओ आणि दलाल यांच्यात ओव्हरलोड वाहनांची लिंकींग मोठी आहे. आरटीओ विभागात ओव्हरलोडेड वाहनांचे ठेके घेणारे जवळपास ३३ पेक्षा अधिक दलाल कार्यरत आहेत. हे सर्व दलाल वेगवेगळ्या ठिकाणचे असले तरी ज्या ट्रकचा हप्ता अधिकाऱ्यांपर्यंत पोहचलेला असतो त्या ट्रकच्या नंबरसह एक बुकलेटच तयार करण्यात येते. हे बुकलेट प्रत्येक फ्लाईंग स्कॉड व चेक पोस्टवर ड्यूटीला असलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात येते. सोलापूरातील प्रत्येक तालुक्यासाठी ३ ते ४ पंटर नेमले आहेत. त्याच्या माध्यमातून लाखोंची वसूली शिं आणी दे नावाचा अधिकारी करत आहे.