रॉबर्ट वाड्रांच्या कार्यालयात IT अधिकाऱ्यांची धडक; बेनामी संपत्ती प्रकरणी चौकशी सुरू

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली :  सोमवारी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्यांनी बेनामी संपत्ती प्रकरणी कॉंग्रेसच्या महासचिव  प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा जाब नोंदवून घेतला आहे. तपासाशी संबंधित असणाऱ्या एका आयटी विभागाच्या सूत्राने याबाबतची माहिती ‘ANI’ वृत्तसंस्थेला दिली. सूत्रांनी सांगितलं की, बेनामी संपत्ती प्रकरणात जाब नोंदवण्यासाठी आयटी टीम रॉबर्ट वाड्राच्या सुखदेव विहार येथील कार्यालयात पोहोचली आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनस्थित ब्रायनस्टन स्क्वेअर येथे 1.9 दशलक्ष डॉलर्स किंमतीचं घर विकत घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे. वाड्रा सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. आयटी विभागाव्यतिरिक्त एनफोर्समेंट डिपार्टमेंट ( ED) मनी लॉन्ड्रिंग (PMLA) च्या तरतुदीनुसार त्यांची चौकशी करत आहे.

यापूर्वी ED ने मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशीसाठी वाड्रांना सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. पण वाड्रांच्या वकिलांनी ईडीचं म्हणणं फेटाळून लावलं होतं. वाड्रांच्या वकिलांनी म्हटलं होतं की, एजन्सी क्लायंटला जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलवेल तेव्हा रॉबर्ट वाड्रा हजर राहतील. आतापर्यंत त्यांनी तपासात पूर्णपणे सहकार्य केलं आहे.

रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलानं असंही म्हटलं आहे की, ईडीनं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं त्यांच्या क्लायंटनं दिली आहेत. ईडीनं केलेल्या आरोपाचं खंडन करणं म्हणजे त्यांना तपासात सहकार्य न करणं असा होत नाही, असंही रॉबर्ट वाड्राच्या वकिलांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *