रिया आणि शौविक चक्रवर्तीसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : रिया आणि शौविक चक्रवर्तीसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे. या दोघांसह सॅम्युअल मिरांडा, अब्दुल बासित परिहार आणि दिपेश सावंत यांच्याही भवितव्याचा फैसला बुधवारी ठरणार आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल सकाळी 11 वाजता या निकालचं वाचन करतील. आपल्यावरील आरोप चुकीचे असून एनसीबीनं चुकीची आणि जाचक कलमं लावल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी कोर्टात केला आहे. तर आपली कारवाई ही योग्यच असून अमली पदार्थांचा व्यवसाय हा एक समाजविघातक गुन्हा असल्यानं तपासयंत्रणेनं या सर्वांच्या जामीनास तीव्र विरोध केला आहे.

दरम्यान मंगळवारी या सर्वांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं त्यांना पुन्हा कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. मुंबई सत्र न्यायालयानं या पाच जणांसह झैद विलात्राला आणखीन 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावत 20 ऑक्टोबरपर्यंत त्यांना जेलमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या बहीणी हायकोर्टात

या दरम्यान याच प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी सुशांत सिंह राजपूतच्या दोन बहिणींनी प्रियंका सिंह आणि मितू सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्यावतीनं अॅड. माधव थोरात यांनी कोर्टाला सांगितलं की, हा निव्वळ या प्रकरणातील प्रमुख आरोपीचा प्रतिहल्ला आहे. अटकेच्या काही तास आधी रिया चक्रवर्तीनं मुंबई पोलिसांत एक तक्रार दाखल केली. ज्यात तिनं आरोप केलाय की, सुशांतच्या बहीणी त्याला एनडीपीएस कायद्यानं प्रतिबंधित केलेलं औषध देत होत्या. त्यासाठी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रूग्णालयातील डॉ. तरूण कुमारनं प्रिस्क्रीप्शन दिलं होतं. मात्र जर एखाद्या डॉक्टरनं लिहून दिलं असेल तर ते औषध दिल्याबद्दल देणाऱ्यावर कसा काय गुन्हा दाखल होऊ शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *