राममंदिराचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करा, उद्धव ठाकरे

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई: अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. मात्र कोरोनामुळं या भूमिपूजनाला विरोध करत याचिका दाखल करण्यात आली आहे. यात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला दिलाय. हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ‘राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राममंदिराच्या मुद्द्याला लढ्याची पार्श्वभूमी आहे. ज्याच्यावर बाबराने आक्रमण करुन मशीद बांधली होती. त्याठिकाणी आपण पुन्हा मंदिर उभं करतोय. केवळ भारतातील हिंदूंचं नाही तर जागतिक कुतुहलाचा हा विषय आहे. आज आपल्याकडे कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं सर्व मंदिरांमध्ये जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छितात, त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचवले.

राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली
उद्धव ठाकरे म्हणाले की, राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नव्हतो त्याही वेळेला राममंदिरात गेलो. किंबहुना योगायोगावर माझी श्रद्धा आहे. माझी भावना हेच सांगते की, नोव्हेंबर 18 मध्ये पहिल्यांदा मी राममंदिरात गेलो होतो, आपण सोबत होतात. शिवनेरीवरची म्हणजे शिवजन्मभूमीची एक मूठ माती मी घेऊन गेलो, त्यानंतर या विषयाला खूप चालना मिळाली. त्याआधी हा विषय थंड पडला होता. कोणी काही विषयच काढत नव्हता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा, पण राममंदिर बनवा,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

… पण ही माझी श्रद्धा
उद्धव ठाकरे म्हणाले की, ही शिवसेनेची मागणी होती. त्यासाठी आपण अयोध्येला गेलो. तुम्ही योगायोग म्हणा, काही म्हणा, ज्या 18 च्या नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेलो, त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये राममंदिराचा प्रश्न सुटला आणि मी मुख्यमंत्री झालो. ही माझी श्रद्धा आहे. ज्याला कोणाला अंधश्रद्धा म्हणायचं असेल त्याने म्हणावे, पण ही माझी श्रद्धा आहे आणि असणारच. मुद्दा काय येतो की, सध्या सर्वत्र कोरोनाचं थैमान आहे. मी ठीक आहे. मी म्हणेन, मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री आहे, पण मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला तिथे मानपान… सगळं मिळतं. मिळालं. तेही शिवसेनाप्रमुख आणि त्यांचा मुलगा म्हणून. ती पुण्याई माझ्याकडे आहेच.

मी जाणार, पण अजून तारीख निश्चित नाही
ते म्हणाले की, राममंदिर हा भावनेचा प्रश्न आहे. लोक भावनेनं त्या विषयाला जोडले गेले आहेत. त्यांना तुम्ही थांबवणार कसे. माझं येणं-जाणं मी करीन. मी मुख्यमंत्री असल्याने मी जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाहीय. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *