सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन राज्य सरकारविरोधात भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे

महाराष्ट्र राजकीय

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारविरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धाव घेतली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास करण्यासाठी मुंबईत आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वॉरंटाईन केलं आहे, यासंदर्भात दखल घेण्यात यावी, अशी मागणी भाजपने केलीय. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे आज एकूण तीन प्रमुख मागण्या मांडल्या.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता विविध नेत्यांनी उडी घेतल्याने या प्रकरणाला राजकीय रंगही चढले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलंय. भाजप नेते राम कदम, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तपास यंत्रणेवर टीका केली. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचं एक शिष्टमंडळ राज्य सरकारच्या विरोधात राज्यपालांना भेटले.

भाजप शिष्टमंडळाच्या प्रमुख तीन मागण्या

  • राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी राज्यातली मंदिरं खुली करण्यात यावीत.
  • सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास करण्यासाठी मुंबईत आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना बळजबरी क्वॉरंटाईन केल्या संदर्भात दखल घेण्यात यावी.
  • तसेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. त्यांना इ-पास तात्काळ उपलब्ध व्हावेत यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात यावेत.

यानंतर राज्यपालांनी राज्याचे मुख्य सचिव यांना फोन करून मंदिर खुली करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज रात्रीपर्यंत निर्णय घ्यावा असे सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पास उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत आशा सूचना केल्या. मात्र, सुशांत सिंग राजपूत प्रकरणा संदर्भातील मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून देईन असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *