यावर्षी कसा असेल मान्सून? हवामान खात्यानं दिली महत्त्वाची माहिती

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि कोरोना विषाणूचा संसर्ग अशा दुहेरी संकटात सापडला होता. पण शेतकऱ्यांना सुखावणारी एक बातमी हवामान खात्यानं दिली आहे. यावर्षीचा मान्सून दिलासादायक असून देशात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे यावर्षी देशातील शेतकऱ्यांच्या शेतात चांगल पीक येऊ शकणार आहे, याचा फायदा कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देखील होणार आहे.

भारतात दरवर्षी साधारणतः जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनचा पाऊस पडतो. मागील तीन वर्षांपासून देशात पावसाची स्थिती सामान्य आहे. यावर्षी देखील ही स्थिती कायम राहणार असून 96 ते 104 टक्के इतका पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 96 ते 104 टक्के दरम्यानचा पाऊस हा आपल्या देशात सामान्य पाऊस मानला जातो. यावर्षी देशात दुष्काळाची शक्यता नाही, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

भारतातील 65 टक्के लोकसंख्या अजूनही शेतीशी (Farming) निगडीत व्यवसाय करतात. यातील बहुतांशी शेतकरी मान्सूनच्या पावसावर शेती करतात. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक मोलाचं ठरणार आहे. यावर्षीचा मान्सूनबाबतचा दुसरा अहवाल मे महिन्यात जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर देशातील मान्सून स्थिती आणखी स्पष्ट होऊ शकेल.

मागील आठवड्यातच स्कायमेटंन यावर्षीचा मान्सून रिपोर्ट जाहीर केला होता. स्कायमेटनं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, यावर्षी जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मान्सून 2021 (Monsoon in 2021) मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या (LPA) 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची शक्यता नसल्याचंही या संस्थेनं स्पष्ट केलं होतं. भारतीय हवामान खात्याच्या या नव्या अहवालामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *