रेल्वेकडून प्रवाशांना मोठा दिलासा, रद्द ट्रेनच्या तिकीटांचं रिफंड मिळण्याचा कालावधी वाढवला

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळातील रद्द झालेल्या नियमित गाड्यांच्या तिकीटांचे पैसे परत घेण्याचा सहा महिन्याचा कालावधी वाढवून तो आता नऊ महिने इतका करण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाने मागील वर्षी कोरोना काळातील 21 मार्च ते 30 जून या दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या होत्या. आता त्या संबंधी बुकिंगचे पैसे रिफंड करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना त्यांच्या बुकिंगचे पैसे मिळवण्यासाठी अधिकचा वेळ मिळू शकतो.

हजारो प्रवाशांचे तिकीट अजूनही कॅन्सल नाही
मंत्रालयाने सांगितले की, लॉकडाऊनच्या आधी तिकीटाचे बुकिंग केल्याच्या तारखेपासून पुढच्या नऊ महिन्यापर्यंत ते तिकीट रद्द करता येऊ शकेल आणि त्याचा परतावा मिळू शकेल. या आधी सहा महिन्याचा कालावधी झाल्यानंतर काही प्रवाशांनी आपल्याला रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकीटांचे पैसे परत मिळावे अशी मागणी केली होती. त्यांनाही पैसे परत दिले जाणार आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या संबंधीचे तिकीट रद्द करण्यासाठीचा कालावधी तीन दिवसांवरुन तीन महिने इतका करण्यात आला होता. मे महिन्यात या कालावधीत वाढ होऊन तो सहा महिने करण्यात आला. काऊंटरवर तिकीट रद्द करण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेता हा कालावधी वाढवण्यात आला होता. हा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी अजून हजारो प्रवाशांचे तिकीट रद्द होऊ शकले नाही. त्यामुळे आता पुन्हा या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

नऊ तारखेला साडे तीन तास आरक्षण बंद
नऊ जानेवारीच्या मध्यरात्री रेल्वेच्या आरक्षणाची सेवा आणि चौकशीची सेवा साडेतीन तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. उत्तर रेल्वे मुख्यालय आपल्या दिल्लीतील पॅसेन्जर रिझर्वेशन सिस्टिम अपग्रेड करणार असल्याने नऊ तारखेला रात्री 11.45 पासून 3.15 पर्यंत पीआरएस संबंधी सर्व सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात रेल्वे आरक्षण करता येऊ शकणार नाही. त्याचसोबत रेल्वेची चार्टिंग आणि 139 नंबरची चौकशी सेवा बंद राहणार आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील ई-तिकीटांची सेवाही बंद राहणार आहे.

खेळाडूंना रेल्वेच्या तिकीटात सूट द्यावी
क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी खेळाडूंना रेल्वेच्या प्रवासासाठी तिकीटाच्या रकमेत सूट मिळावी अशी मागणी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. किरण रिजिजू यांनी यासंबंधी रेल्वे मंत्रालयाला एक पत्र पाठवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *