कलकत्ता : कलकत्त्यातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. येथे एक मोलकरीण मालकाच्या मृत्यूच्या 71 दिवसांनी लखपती झाल्याची बाब उघडकीस आली आहे. मोलकरणीने मृत मालकाच्या एटीएममधून 71 दिवसांत 34 लाख 90,000 रुपये काढले. मात्र कलकत्याच्या डिटेक्टिव्ह विभागापासून ती वाचू शकली नाही. कलकत्ता पोलीस अधिकाऱ्यांनी ही एक रेअर केस असल्याचे सांगितले.
खरे पाहता, 45 वर्षीय मोलकरीण रिता रॉय ही दक्षिण कलकत्त्याच्या अनवर शाह रोडवरील अप-मार्केट रेसिडेंशियल कॉम्प्लेक्समध्ये काम करीत होती. तिने मृत मालक सत्यनाराय़ण अग्रवाल यांचं एटीएम चोरलं. सत्यनारायण यांचं एक्सिस बँकेत अकाऊंट होते.
अग्रवाल नेहमीच पिन विसरायचे म्हणून त्यांच्या मुलाने मॅसेज टाइप करुन त्यांना इनबॉक्समध्ये पाठविला होता. मोलकरणीने हा पिन मिळवला होता. मोलकरणीने नादिया जिल्ह्यातील करीमपूरमध्ये राहणारे 31 वर्षीय जावई रणजीत मलिक आणि हुगली जिल्ह्यातील बालागढमध्ये राहणारे 45 वर्षीय सौमित्र सरकार याला पैसे काढण्यासाठी एटीएम दिलं. अनुराग अग्रवाल याला जेव्हा पैसे चोरी झाल्याची माहिती मिळाली त्याने जाधवपूर पोलीस ठाण्यात 1 जून रोजी तक्रार दाखल केली.
येस बँकेच्या रेकॉर्डवरील मिळालेल्या माहितीनुसार 20 मार्च ते 30 मे या दरम्यान अनेक एटीएममधून पैसे काढण्यात आले. या सर्व एटीएम मशीन नादियाच्या करीमपूर, कृष्णानगर आणि रानाघाट, हुगलीमधील गुप्तीपारा येथील होती.
एटीएम मशीनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमध्ये चोर मास्क आणि टोपी घातल्याचे दिसले. कोरोनाचा फायदा घेत चोरांनी तोंड झाकले होते. मात्र यानंतर डिटेक्टिव टीममध्ये या भागातील लोकांची विचारपूस केल्यानंतर नेमका खुलासा झाला. यानंतर पोलिसांनी मोलकरीण रीता रॉय यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 27 लाख रुपये जप्त केले.