पुण्यात पोलीस निरीक्षक सायकलवर फिरुन कंटेंन्मेंट झोनमध्ये करतायत जनजागृती

पुणे

पुणे : करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंन्मेंट झोनमध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पुण्यात एक पोलीस निरीक्षक चक्क सायकलवर फिरुन कंटेंन्मेंट झोनमधल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी घरातच थांबावे यासाठी जगजागृती करत आहे. देविदास घेवारे असे या पोलिसाचे नाव असून ते दत्तवाडी पोलीस ठाण्यात निरीक्षक आहेत. देविदास घेवारे यांच्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तब्बल 12 ते 14 कंटेंन्मेंट झोन आहेत. पुण्यामध्ये करोनाचा आणखी फैलाव होऊ नये, यासाठी या भागांमध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेऊन देविदास घेवारे सायकलवर फिरुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देतात.
आमच्या हद्दीत 12 ते 14 कंटेंन्मेंट झोन असून बहुतांश झोपडपट्टयांचा भाग आहे. हे सर्व भाग बंद आहेत. कार जिथे पोहोचू शकत नाही, तिथे सायकलमुळे पोहोचणे शक्य होते असे देविदास घेवारे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.करोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. पण आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही. सायकल चालवल्यामुळे तेवढाच व्यायाम होतो आणि लोकांशी संवादही साधता येतो असे घेवारे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात मागच्या 24 तासात 3218 करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात करोनामुळे आतापर्यंत 1,504 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *