“गरज पडली तर आम्ही शिमल्यातील प्रियंका गांधींचं घरही पाडू”; भाजपाच्या महिला नेत्याचे वक्तव्य

ताज्या घडामोडी देशविदेश राजकीय

मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. हिमाचल प्रदेशातून बुधवारी ती मुंबईत दाखल होताच प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि राजकीय वर्तुळाने सारे विषय बाजूला सारत कंगनावर लक्ष केंद्रित केले. याचवरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर आता हिमाचल प्रदेशमधील भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख महिला नेत्याने राज्यातील प्रियंका गांधी यांचा बंगला पाडला जाऊ शकतो असा इशारा दिला आहे.  काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा शिमल्यापासून १३ किमी दूर छराबडा येथे अलिशान बंगला आहे. त्याचसंदर्भात महिला मोर्चाच्या प्रमुखांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी या वक्तव्याचे समर्थन केलेलं नाही.

समोर आलेल्या माहिती नुसार हिमाचलमधील भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख शाशिम धर सूद यांनी एका व्हिडिओमध्ये प्रियंका यांचा बंगला पाडण्याचा इशारा दिला होता. या व्हिडिओमध्ये सूद यांनी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईचा निषेध केला. “गरज पडली तर आम्ही शिमल्यात घर बांधणाऱ्या आणि क्राँग्रेस की बेटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रियंका गांधीनाही आम्ही सोडणार नाही. आम्ही आश्वासन देतो की आम्ही त्यांचं घरही तोडू,” असं सूद या व्हिडिओत म्हणाल्या आहेत. भाजपाच्या महिला नेत्याने दिलेल्या या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी मात्र असहमती व्यक्त केली आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्र सरकारने हिमाचलच्या मुलीला लक्ष्य केलं आहे त्याची आम्ही निंदा करतो, मात्र आम्ही या वक्तव्याचे समर्थन करत नाही, असं ठाकुर म्हणाले.कंगना ही मूळची हिमाचलची आहे. त्यामुळेच मुंबईमध्ये महानगरपालिकेने केलेल्या कारवाईनंतर हिमाचलमधील अनेकांनी या कारवाईचा निषेध केला आहे. गुरुवारी भाजपाच्या महिला मोर्चाने मुंबईमध्ये झालेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी कंगनाच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.

काय आहे प्रियंका यांच्या घरासंदर्भातील वाद ?

२००८ साली प्रियंका गांधी यांच्या मालकीच्या या बंगल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिमाचलमधील काँग्रेसचे नेता केहर सिंह खाची यांच्या नावावर प्रियंका यांचा बंगला असणाऱ्या भूखंडाची पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. सन २०११ मध्ये दोन मजल्यांपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर डिझाइन न आवडल्याने पूर्ण बांधकाम तोडण्यात आलं होतं. प्रियंका यांना घर बांधण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने लॅण्ड रिफॉर्म कायद्यामधील कलम ११८ मधील नियमांमध्ये सूट देण्यात आल्याचा आरोप केला जातो. या कलमानुसार हिमाचलमध्ये बाहेरील राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना जमीन विकत घेता येत नाही. सन २००७ मध्ये ०.४० एकर (एक बिगा) जमीनीची किंमत १ कोटी रुपये इतकी होती. प्रियंका यांनी चार बिगा म्हणजेच १.६० एकर जमीन अवघ्या ४७ लाखांना विकत घेतली.

प्रियंका गांधी यांचा हा बंगला खास हिमाचली पहाडी वास्तूकलेनुसार बनवण्यात आला आहे. इंटीरीयरसाठी देवदारच्या झाडाचे लाकूड वापरण्यात आलं आहे. घराच्या चहूबाजूला हिरवळ आणि पाइन वृक्ष आहेत. समोर हिमायलाच्या पर्वत रांगा दिसतात. हा बंगला छराबडा परिसरात आहे. या घरासंबंधितील वादावरुन प्रियंका यांना उच्च न्यायालयाची नोटीसी मिळाली आहे. प्रियंका अनेकदा सुट्ट्यांसाठी या बंगल्यावर येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *