दिल्ली : काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार आता एका आठवड्यात त्या नवी दिल्लीतील लोढी इस्टेटमधील आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार प्रियंका गांधी आपल्या कुटुंबीयांसहित गुरुग्राममधील सेक्टर 42 मध्ये असलेल्या डीएलएफ अरालिया येथील घरात वास्तव्य करणार आहे. दरम्यान, त्या या ठिकाणी काही दिवसांसाठीच राहणार असल्याची माहिती प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका गांधी यांच्या वास्तव्यासाठी नवी दिल्लीतील दोन तीन ठिकाणी भाड्याचं घर पाहण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्यापैकी एक घर अंतिम करण्यात येणार आहे. यापैकी सुजान सिंह पार्क नजीक असलेल्या एका घरात त्या वास्तव्यास जातील अशी अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी घराच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार प्रियंका गांधी यांनी आपलं सामान गुरुग्राम येथील घरात हलवलं आहे. तसंच सुरक्षेबाबतही सर्व तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांना झे़ड + श्रेणीचं संरक्षण देण्यात आलं आहे. दरम्यान, आपल्या राजकीय बैठकींसाठी त्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाचा वापर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
यापूर्वी त्या लखनौमध्ये वास्तव्यास जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु त्या जेव्हा लखनौच्या दौर्यावर जातील तेव्हाच हे त्यांचं निवासस्थान असणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूंमीवर प्रियंका गांधी या आपला सर्वाधिक वेळ उत्तर प्रदेशातच घालवणार आहे. ऑगस्ट महिन्यात त्या उत्तर प्रदेशचा दौरा करू शकतात अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्रानं दिली.
घर रिकामं करण्यासाठी नोटीस
यापूर्वी प्रियंका गांधी यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार 1997 पासून त्या नवी दिल्लीतील लोढी इस्टेटच्या 35 क्रमांकाच्या बंगल्यात वास्तव्यास होत्या. गेल्या वर्षी त्यांची एसपीजी सुरक्षा हटवून झेड+ करण्यात आली होती. 1 जुलै रोजी त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार त्यांना 31 जुलैपर्यंत हा बंगला रिकामा करावा लागणार होता.