देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचं झालं पोस्टमार्टम

ताज्या घडामोडी देशविदेश

भोपाळ : देशात पहिल्यांदा मध्य प्रदेशातील भोपाळमधीळ एम्स (AIIMS) मध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे शरीरावर काय परिणाम होतो, याची माहिती करुन घेण्यासाठी हे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. आतापर्यंत परदेशातील संशोधनाच्या आधारावर देशात कोरोना रुग्णांवर उपचार केला जात आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदे (ICMR) च्या परवानगीनंतर भोपाळ एम्सने संशोधनासाठी संसर्ग झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. संशोधनासाठी भोपाळ एम्सकडून कमीत कमी 10 संसर्ग झालेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. यातून अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो.

परदेशात झालेल्या संशोधनानुसार ही बाब समोर आली आहे की, कोरोनाबाधित रुग्णाचं ह्रदय, मेंदू आणि फुप्फुसांमध्ये रक्त जमा होते. भारतात कोरोना रुग्णांच्या शरीरावर या विषाणूचा काय परिणाम होतो हे अद्याप समोर आलेलं नाही, याचसाठी हे संशोधन केले जात आहे.

भोपाळच्या एम्सचे निर्देशक यांनी सांगितले की, एम्सच्या वरिष्ठ कमिटीने कोरोनाबाधित मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली आहे. अद्यापही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही की कोरोनामुळे सर्वाधिक परिणाम मनुष्याच्या शरीरातील कोणत्या अवयवावर होतो. संशोधनानंतर याबाबत नेमकी माहिती मिळू शकेल. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत होऊ शकेल. जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यत हे उपाय फायदेशीर सिद्ध होऊ शकतात. यामुळे रुग्णांना अवयव निकामी होण्यापासून मदत मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *