खुनातील आरोपीला घरी मटणाच्या पार्टीला नेने दाेन पोलिसांना पडले महागात, दोन पोलिस कर्मचारी निलंबीत

क्राईम सोलापूर


मंगळवेढा(प्रतिनिधी )ः मंगळवेढा सबजेलमधून खूनाच्या गुन्हयातील आरोपीला आंबे ता. पंढरपूर येथील त्याच्या घरी बेकायदेशीररित्या नेवून बोकडाच्या मटणाची पार्टी केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक बजरंग माने व उदय ढोणे यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
शुक्रवार दि.१७ जुलै रोजी सबजेलमध्ये असलेला खूनाच्या घटनेतील आरोपी तानाजी भोसले (रा.आंबे वय 31) हा आजारी असल्याचे दाखवून दुपारी १२.३० वा. पोलिस नाईक बजरंग माने व उदय ढोणे या दोघांनी बाहेर काढून खाजगी वाहनातून थेट आंबे ता. पंढरपूर येथे आरोपीच्या घरी नेण्यात आले.या घटनेच्या बातम्या गुरुवारी वृत्तपत्रात झळकताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढयास भेट देवून या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली.सदर पोलिसांनी बेकायदेशीरित्या आरोपीला बाहेर काढून मटण पार्टीसाठी त्याच्या गावी खाजगी वहानातून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले.या तपासासाठी डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी सी.डी.आर.ची मदत घेवून घटनेचा छडा लावला.ग्रामीण रुग्णालयात आरोपीला दुपारी २.२४ वा.नेल्याचे चौकशीत आढळले.सबजेलमधून  ग्रामीण रुग्णालयात जाण्यास केवळ ५ मिनीटाचा कालावधी लागत असताना २ तासाच्या कालावधीत कुठे गेले असा संशय आल्याने या घटनेचे बिंग फुटले.पोलिस अधिकार्‍यांनी आरोपी जेलच्या बाहेर काढल्यापासून ते आरोपीला जेलमध्ये आणून ठेवण्यापर्यंत संपूर्ण कागदपत्रे व पुरावे तपासल्यानंतर या घटनेचे गुढ उकलले.अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी ही घटना गंभीर असून प्राथमिक कारवाई म्हणून त्या दोघांना सेवेतून निलंबीत करीत असल्याचे सांगून  असे  खात्याला बदनाम करणारे पोलिस ठेवणे उपयोगाचे नसल्याचे ते म्हणाले. पोलिस हा कायदयाचा रक्षक असतो.मात्र येथील दोन पोलिसांनी थेट कारागृहातून आरोपीला मटणाच्या जेवणासाठी घरी नेले.दरम्यान आरोपीने कायदयाचे संरक्षण करण्याऐवजी कायदाच हातात घेवून कायदयाचा गैरवापर केल्याने निलंबन ही कारवाई मर्यादीत असून त्यांच्यावर पोलिसांत थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी सुज्ञ व ज्येष्ठ नागरिकांतून होत आहे. या घटनेमुळे मंगळवेढा पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. दरम्यान,कारागृहातून तीन आरोपी पळून जाण्याचा प्रकार घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *