पोलीसांची धाड पडली अन संशयीत आरोपीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली

क्राईम ताज्या घडामोडी

सोलापूर शहरातील घटना,उडी मारणाऱ्याचा जागीच मृत्यू

सोलापूर (प्रतिनिधी)

शहरातील न्यू पाच्छा पेठे येथील एका घरात मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा मारायला आल्याचे पाहून शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांसमोर मटका कंपनीत काम करणाऱ्याने मारतीवरून उडी मारली.त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.या प्रकरणी नगरसेवक सुनील कामाटी, पोलीस शिपाई स्टीफन स्वामी च्यासह ४0 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत मयत झालेल्याचे परवेझ नुरूद्दीन इनामदार (वय ४२, रा.साईनाथ नगर,भाग १, नई जिंदगी सोलापूर) असे नाव आहे.हा न्यू पाच्छा पेठेतील एका मटका जुगार कंपनीत चिठ्या गोळा करून त्याचा हिशोब ठेवण्याचे काम करीत होता. न्यू पाच्छा पेठ कोंचीकोरवे गल्ली येथे एका दुमजली घरामध्ये मटका कंपनी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पथक छापा टाकण्यासाठी गेले होते. पोलीस आल्याचे पाहन तेथील काहीजणांनी पळ काढला तर तेथे असलेला परवेझ इनामदार याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असतानाच त्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला.

पोलीसांसमोरच त्याने उडी मारल्याने नेमके तेथे काय घडले याबाबत अधिकृत काहीच सांगण्यात आले नाही.न्यू पाच्छा पेठ हा परिसर जेलरोड आणि सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो त्यामुळे घटनास्थळ नेमके कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे हे न समजल्याने गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जेलरोड आणि सदर बझार पोलीसांना कळवले.त्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोगल आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी तसेच सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळुंखे आणि त्यांचे इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी हजर झाले परंतु घटना घडलेली इमारत ही जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते हे समजल्याने जेलरोड पोलीसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय
रुग्णालयाकडे पाठवला. नगरसेवक सुनील कामाठी,पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी याच्यासह ४0 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *