बिहार पोलीस सुशांतच्या मॅनेजरच्या आत्महत्येचीही चौकशी करणार, 48 तासात मोठ्या कारवाईची शक्यता

क्राईम मुंबई

मुंबई : अभिनेता सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने तपास एका नव्या मुद्द्यावर सुरु केला आहे . बिहार पोलिसांनी सुशांतची मॅनेजर दिशा सालीयनच्या आत्महत्येचीही चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. दिशा सालीयन ही सुशांतच्या कंटेंट मॅनेजमेंट टीममध्ये होती. तिने 8 जून रोजी आत्महत्या केली. म्हणजेच सुशांतच्या आत्महत्येच्या (14 जून) 5 दिवस आधी आत्महत्या केली.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचा संबंध 5 दिवसांपूर्वीच झालेल्या त्याच्या मॅनेजरच्या आत्महत्येशीही जोडला गेला. मात्र, आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या तपासात तो मुद्दा तितका प्रकर्षाने पुढे येताना दिसला नाही. मात्र, बिहार पोलिसांनी अत्यंत वेगाने सूत्रं हलवत सुशांतच्या आत्महत्येच्या संबंधात या सर्वच दृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली. दिशा सालीयन सुशांतची कंटेंट मॅनेजर होती. मात्र, दिशा एकदाच सुशांतला भेटल्याचंही सांगितलं जातं.

बिहार पोलीस आता दिशाच्या आत्महत्येची कागदपत्रे देखील पाहणार आहे. तसेच दिशा सालीयन हिने आत्महत्या केली त्या ठिकाणालाही हे पथक भेट देणार आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांनी सुशांतची मॅनेजर दिशा सालियानवर तपास केंद्रित केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बिहार पोलिसांचं पथक मालाड पोलीस ठाण्यात पंचनामा कॉपी, कॉल डिटेल्स आणि कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी 48 तासात बिहार पोलीस मोठी कारवाई करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सुशांतची मॅनेजर दिशा सालियान हिचे पिता दादर नायगाव येथे राहतात. त्यामुळे बिहार पोलीस येथेही पोहचू शकतात. सध्या सालियान यांच्या घराचा दरवाजा कुणीही उघडत नाही. ते घरी नसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे बिहार पोलीस दिशा सालीयान आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध शोधण्यात यशस्वी ठरतात की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *