क्रीडा संकुल पेनुर येथेच व्हावे : सचिन चवरे

0
101
केवळ राजकारणासाठी दुसरी जागा सुचवणे अयोग्य..
गावाच्या वैभवात भर टाकणारे क्रीडा संकुल पेनुर येथेच व्हावे – सचिन चवरे
जनसत्य प्रतिनिधी
मोहोळ :मोहोळ तालुक्यातील विद्यार्थी व युवकांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, तालुक्यातील येथे येणारे अनेक  खेळाडू राज्यपातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर मोहोळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करावेत, या उद्देशाने मोहोळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पेनुर येथे पाच कोटी रुपयांचे क्रीडा संकुल होणे गरजेचे असून केवळ स्थानिक राजकारणाचा राग मनात धरून क्रीडा संकुल दुसरीकडे जागा सुचवणे, ही चुकीची बाब असल्याचे मत शिवछत्रपती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू सचिन चवरे यांनी व्यक्त केले.
मोहोळ तालुक्याच्या साठी क्रीडासंकुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जागेअभावी हा प्रश्न प्रलंबित आहे. याविषयी माजी क्रिकेटपटू सचिन चवरे यांनी आपली भूमिका मांडताना म्हणाले की, मोहोळ येथे क्रीडा संकुल मंजूर होते, परंतु अपेक्षित जागेअभावी होऊ शकले नाही, दरम्यान पेनुर येथे पाटकूल पाटीजवळ जुन्या दगडखाणी जवळ शासकीय जागेची क्रीड़ा संकुल साठी पाहणी माजी आमदार राजन पाटील व लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आ.यशवंत माने, तहसीलदार जीवन बनसोडे,पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा क्रीड़ा अधिकारी ताराळकर यांनी या जागेची पाहणी करून हिरवा कंदील दिला आहे. मात्र स्थानिक राजकारणाचा राग मनात धरून पेनुर येथे होणारे क्रीडा संकुल दुसरीकडे व्हावे, अशी मागणी काही स्थानिक नेते करीत आहेत. ही बाब चुकीची असून आपल्या गावाच्या वैभवात भर टाकणारे क्रीडा संकुल पेनुर येथेच व्हावे. विकास कामात अडथळा निर्माण होऊ नये, पेनुर हे गाव मोहोळ तालुक्याचा बाहेरील नाही, या भागात  क्रीडाप्रेमी तसेच खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोणताही गाव वाद न करता खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन पेनुर येथे क्रीडा संकुल व्हावे आणि यासाठी या भागातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कोणतेही राजकारण न आणता सहकार्याची भूमिका ठेवावी, अशी अपेक्षाही यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन चवरे यांनी व्यक्त केली.
मोहोळ तालुक्यात जागा उपलब्धतेनुसार पेनुर परिसरामध्ये दहा एकर प्रशस्त अशा शासकीय जागेवर शासनाकडून माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नांमधून पाच कोटी रूपयांचे क्रीडासंकुल मंजूर झाल्यास मोहोळ तालुक्यात सह पेनुर परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. तालुक्यातील असणाऱ्या क्रीडाप्रेमी युवकांना यामुळे मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पेनुर येथेच क्रीडा संकुल व्हावे, यासाठी वरील नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील असणार आहे.
सचिन चवरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here