नवी दिल्ली : सध्या कोविड 19 च्या साथीमुळे डिजिटल पेमेंटच्यापर्यायाची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने व्यापाऱ्यांकरता पेटीएम वॉलेटवरहोणाऱ्या पेमेंटससाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पेटीएम वॉलेटसह युपीआय आणि रूपे कार्ड्सच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटसवरही शून्य टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.
याचा फायदा पेटीएमशी जोडलेल्या 17 दशलक्षांहून अधिक व्यापाऱ्यांना होईल. आता व्यापारी पेटीएम वॉलेटवर जमा झालेली सर्व रक्कम कोणत्याही काटछाटशिवाय बँकेत जमा करू शकतील. कितीही व्यवहार झाले तरी त्यांना त्यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे पेटीएमने सिंगल पॉईन्ट ऑफ रिकन्सीलेशन सुविधाही उपलब्ध केली असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना ग्राहकांकडून पैसे स्वीकारण्याकरता वेगवेगळे क्यू आर कोड ठेवण्याची गरज भासणार नाही
पेटीएम वॉलेट, पेटीएम युपीआय आणि इतर युपीआय अॅपच्या माध्यमातून होणारी सर्व पेमेंटस स्वीकारण्यासाठी व्यापारी आता ‘ऑल इन वन क्यूआर’ हा पर्याय सिलेक्ट करू शकतात, असं या संदर्भात पेटीएमने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुमार आदित्य म्हणाले, ‘देशभरातील व्यापाऱ्यांनी वॉलेट पेमेंटसचा पर्याय मोठ्या प्रमाणात स्वीकारावा यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. आता व्यापारी कोणत्याही शुल्काची काळजी न करता बँकेत आपले पैसे जमा करू शकतील. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावरील आपलं शुल्क वाचवून अधिक बचत करण्याची संधी व्यापाऱ्यांना मिळेल. आता व्यापारी एका क्यूआर कोडच्या माध्यमातून अमर्याद व्यवहार करू शकतात.’
सध्याच्या काळात डिजिटल पेमेंटची गरज वाढत आहे, अशा वेळी या नवीन शून्य शुल्क आकारणी सेवेमुळे पेटीएम अधिक उपयुक्त ठरेल आणि त्याचा वापर वाढेल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही महिन्यांत पेटीएमने आपल्या प्लॅटफॉर्मशी जास्तीत जास्त व्यापारी जोडले जावेत यासाठी अनेक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली आहे. पेटीएम पोस्टपेडच्यासहाय्याने किराणा दुकानांसह उबेर, पतंजली यासारख्या अनेक मोठ्या ब्रँडसशी हातमिळवणी केली आहे. टीअर टू, टीअर थ्री शहरांमधील ग्राहकही जोडले जावेत यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.
नुकतीच कंपनीने पेटीएम पोस्टपेड ग्राहकांसाठी फ्लेक्झीबल ईएमआयची सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे पेटीएम पोस्टपेड ग्राहक आता वस्तू खरेदी करून त्याची किंमत अल्प व्याजदरातील सुलभ हप्त्यांमध्ये देऊ शकतात. पेटीएम मॉल, उबेर, Myntra, लेन्सकार्ट, गाना, Pepperfry, हंगरबॉक्स, पतंजली आणि अन्य ब्रँडसच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहक ही सुविधा वापरू शकतात.