साखरेचं उत्पन्न कमी करुन इथेनॉलची निर्मिती करणार : शरद पवार

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पुणे : उस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. पुण्यात बोलताना  शरद पवार म्हणाले की, यावर्षी उसाचं क्षेत्र खूप वाढलंय. त्यामुळं यावेळी आणि पुढील वर्षी या उसाचं गाळप कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे.  त्यामुळं 25 ते 30 टक्के साखर उत्पन्न कमी करुन त्या ऐवजी इथेनॉलची निर्मिती करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण अनुकूल आहे.  इथेनॉलची निर्मिती करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या धोरणाचा अभ्यास केला आहे आणि इथेनॉलचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना इथेनॉलपासून साखरे इतकेच उत्पन्न मिळेल. आणि त्यासाठी वेळ ही कमी लागेल. केंद्र सरकारच्या शेती धोरणांबाबत आम्हा लोकांची नाराजी आहे.  आमच्याहीपेक्षा पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात या धोरणांना जास्त विरोध आहे, असं पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकार जे सांगतंय की आम्ही बाजारपेठ खुली केलीय. यामध्ये विशेष काही नाही. पण केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण याच्या उलट आहे.  या विसंगतीबाबत आमची नाराजी आहे. केंद्र सरकारच्या या विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात करणार नाही असं अजित पवार म्हणाले आहेत याबद्दल मी माहिती घेईन, असं देखील पवार म्हणाले.

कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत?

कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती सीरमनं शरद पवारांना दिली आहे. काल त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन घेतले. माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील घेतले. मात्र हे कोरोनाचे औषधं नाही. सीरमची लस तयार व्हायला जानेवारीचा शेवट येईल असं मला त्यांनी सांगितलंय, असं शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *