दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात जवळपास 30 टक्के खासदारांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. पॉझिटिव्ह सदस्यांमध्ये शिवसेनेच्या लोकसभेतील 4 खासदारांचाही समावेश आहे.
तर या आधीच अनेक खासदार आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यातले अनेक जण कोरोनामुक्तही झाले आहेत.
त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली.
कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली आहे. अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अजुन मिळालेले नाही अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे.