माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन

ताज्या घडामोडी पंढरपूर

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. पुण्यातील वैकुंठभूमीत आज (18 ऑगस्ट) सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निर्वतला आहे.

कोरोनाचा फैलाव पंढरपूर परिसरात वाढल्यावर 5 ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलं होतं. मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आलं होतं. अखेर काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुधाकरपंत परिचारक अखेरपर्यंत जनतेच्या कार्यात मग्न होते. पंतांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

सुधाकरपंत परिचारक हे पाच वेळा पंढरपूरचे आमदार होते. एसटी महामंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या परिचारक यांची ‘सहकाराचे डॉक्टर’ म्हणून ओळख होती. अडचणीत असलेल्या अनेक सहकारी संस्थांना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने बाहेर काढलं. श्रीपूर इथल्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसंच मोहोळ तालुक्याती भीमा सहकारी साखर कारखान्याचं अनेक वर्ष नेतृत्त्व केलं होतं.

सुधाकरपंत परिचारक गेले दोन दिवस व्हेंटिलेटरवर होते. काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचं कोरोनामुळे निधन झालं. कोरोनाच्या नियमावलीत पुण्यात सर्व अंत्यविधी पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली.

सुधाकरपंत परिचारक यांचा अल्पपरिचय

– सुधाकरपंत परिचारक यांनी 25 वर्षे विधानसभेत पंढरपूर मतदारसंघाचे नेतृत्त्व केलं आहे. 1985 ते 2009 पर्यंत ते आमदार होते. तर 1999 ते 2008 इतका दीर्घकाळ ते राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष होते.

– सुधाकरपंत परिचारक जवळपास 50 वर्षाहून अधिक काळ सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकारात अखेरपर्यंत सक्रिय होते.

– सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, दूध संघ, जिल्हा परिषद यासह अनेक संस्थांवर त्यांचा शब्द महत्त्वाचा मानला जात होता.

– सुरुवातीला वसंतदादा पाटील गटात काम करणारे सुधाकरपंत राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. ही विधानसभा मात्र त्यांनी भाजप पुरस्कृत आघाडीकडून लढवली होती.

– सध्या ते श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *