पंढरपूरमध्ये जयंत पाटील यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ

ताज्या घडामोडी पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादी आणि भाजप) हे दोन पक्ष आमने-सामने आले आहेत. भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगिरथ भालके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच दोन्ही पक्षाचे राज्य पातळीवरील दिग्गज नेते या मतदारसंघात दाखल झाले असून आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवरून खळबळजनक दावा केला आहे. ‘पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी परिचारक अवताडे गटाची युती हे आमच्यासाठी आव्हान नाही. कारण परिचारक आणि आवताडे गटाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

चंद्रकांत पाटलांनीही फटकारलं

पंढरपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. ‘महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये भांडण लावण्याचे काम चंद्रकांत पाटलांनी करू नये. महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची स्वप्न चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्यांना दररोज पडतात,’ असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसंच मुख्यमंत्री काँग्रेस , राष्ट्रवादीसह घटक पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात, असं सांगायलाही जयंत पाटील विसरले नाहीत.

चंद्रकांत पाटलांचं मतदारांना आवाहन

एकीकडे जयंत पाटील यांनी पंढरपूरमधून भाजपवर टीका केली असतानाच चंद्रकांत पाटील हेदेखील आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी मैदानात उतरले आहेत. ‘पंढरपूरची निवडणूक आम्ही ताकदीने लढवत असून यामध्ये नक्कीच विजय मिळवू,’ असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजपचे दिग्गज नेते पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची होणार, हे मात्र नक्की. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *