मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी, एसटी बंद

ताज्या घडामोडी पंढरपूर

पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) येत्या 7 नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून मुंबई येथे पायी दिंडी-आक्रोश मोर्चा निघणार आहे. पायी दिंडी ही येथील नामदेव पायरीचे दर्शन करून मुंबईकडे रवाना होणार आहे. 19 दिवस प्रवास करून मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी तर शहरात जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारीत केले आहेत. तर पंढरपूरकडे येणारी एसटी बस सेवा देखील दोन दिवसासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने सरकारविरोधात पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी निघणार आहे. दिंडी शनिवारी 7 नोव्हेंबर रोजी नामदेव पायरी येथून विठ्ठलाचे दर्शन करुन मुंबईकडे जाणार असल्याचा नियोजित कार्यक्रम आहे.

या पार्श्वभूमीवर नुकतेच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाद्वार नामदेव पायरी चौफळा या संपूर्ण परिसरात शनिवारी 7 नोव्हेंबर रोजी संचारबंदी लागू केली आहे. तर उर्वरित पंढरपूर शहरात दोनपेक्षा अधिक व्यक्तींना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पर्यायाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. शिवाय मराठा आंदोलकाना शुक्रवार पासूनच जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

याशिवाय मराठा समाजाच्या या पायी दिंडीसाठी इतर जिल्ह्यातून मराठा समाज येऊ शकतो. या अनुषंगाने पंढरपूरकडे येणारी व जाणारी संपूर्ण एसटी बस वाहतूक शुक्रवार व शनिवारी बंद ठेवण्याचे देखील आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहेत. संबंधित आदेशामध्ये जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता, अशा मोर्चाने संसर्गाचे प्रमाण अधिक वाढू शकते . असेही नमूद करण्यात आले आहे.

सरकारसह विरोधकांनाही इशारा…

मराठा समाजाचा राजकारणासाठी उपयोग करू नये, असा इशारा सकल मराठा समाजानं सरकार व विरोधीपक्षाला दिला आहे. विठ्ठलाला साकडे घालून 7 नोव्हेंबरला धडक आक्रोश मोर्चा निघणार आहे, अशी माहिती मराठा सकल मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर व महेश डोंगरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *