लोकांच्या हितासाठी पंढरीत लॉकडाऊन जाहीर करा : कोळी महासंघाचे पांडुरंग सावतराव यांची मागणी
पंढरपूर प्रतिनिधी:ज्यावेळी पंढरपूर शहरात व पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता त्यावेळी लॉकडाउन व नियम कडकडीत पाळले जात होते.
संपूर्ण पंढरपूर तालुक्यात व शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.मात्र सध्या कोरोनाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर तालुक्यातही थैमान घातलेले असताना सध्या मात्र लोकांना फिरण्यासाठी मोकळीक दिली असल्याने कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात मिळून ५० च्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सध्या यावर आळा घालणे आवश्यक बनले आहे.
त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा व जीविताचा विचार करता पंढरीत कमीत कमी दहा ते पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्याची मागणी कोळी महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष पांडुरंग सावतराव यांनी पंढरपूर प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनाला आताच आळा घातला नाही तर संपूर्ण पंढरपूर शहरासह तालुक्यात याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होईल व त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसेल त्यामुळे प्रशासनाने याचा गंभीरपणे विचार करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोळी महासंघाच्या मार्फत पांडुरंग सावतराव हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा करत आहेत.तसेच कोरोनाच्या महामारीच्या काळातही त्यांनी अनेक गरजू लोकांना मोफत जेवण पुरविले आहे.
तसेच यापुढेही सदर समाज हिताचे काम चालूच राहील अशी माहीती त्यांनी दिली.आम्ही केलेली समाजहिताची मागणी लक्षात घेता प्रशासन यावर सकारात्मक निर्णय घेईल असेही त्यांनी सांगितले.